Home Breaking News • आनंद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न ...

• आनंद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न • तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर; पालक-शिक्षक समन्वयाचे महत्व अधोरेखित

129

• आनंद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

• तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर; पालक-शिक्षक समन्वयाचे महत्व अधोरेखित

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर 

तालुका प्रतिनिधी, वरोरा 

वरोरा (ता.प्रतिनिधी) – आनंद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली. या सभेचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. निलेश उगेमुगे आणि उपप्राचार्य प्रा. सौ. राधा सवाने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेचे पूजन व ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या मंगल प्रार्थनेने करण्यात आली. प्रास्ताविक करताना प्रा. विश्वजीत गजरे यांनी पालक-शिक्षक संवादाचे महत्व अधोरेखित केले. मागील सत्रातील अहवालाचे वाचन माजी सचिव प्रा. रमेश पळसुटकर यांनी केले.
यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड पार पडली. विजयराव थुटे यांची उपाध्यक्ष, तर सौ. शिल्पा गावंडे यांची सहसचिव म्हणून निवड झाली. पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून विद्यार्थी विकासासाठी अधिक प्रभावी कार्य करता येईल, असा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. निलेश उगेमुगे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे हे काळाचे अनिवार्य भान असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात याचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपप्राचार्य सौ. राधा सवाने यांनी पालकांनी शिक्षकांशी नियमित संवाद ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी विद्यार्थ्यांनी खचून न जाता आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टीकोनाने पुढे जावे, असे सांगितले.
सभेच्या समारोपाला शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्वयंशासन उपक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. सौ. स्मिता हुमणे यांनी बक्षीस वितरणाची धुरा सांभाळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव नीरज आत्राम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. दीप्ती चिटणीस यांनी केले. शेवटी ‘पसायदान’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध समित्यांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.