इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरचा सामाजिक उपक्रम: विद्यार्थिनींसाठी फॅन्स आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
चंद्रपूर : 21 सप्टेंबर इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरतर्फे चोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विविध दुर्गम भागांतून शिक्षणासाठी चंद्रपूरमध्ये आलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला.
वसतिगृहातील विद्यार्थिनींना अभ्यासासाठी योग्य वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने क्लबकडून सीलिंग आणि वॉल फॅन्सचे वाटप करण्यात आले. उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करून शिक्षणात सातत्य ठेवण्यास मदत व्हावी, हा यामागील प्रमुख हेतू होता. हे फॅन्स क्लबच्या सदस्या बबिता अग्रवाल, रंजना पडवेकर आणि संतोष मित्तल यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आले.
यासोबतच, मासिक पाळीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी रेड डॉट पेपर बॅग्सचे वाटप करण्यात आले. या बॅग्स ज्ञानार्चना संस्थेकडून खरेदी करून विद्यार्थिनींना देण्यात आल्या.
उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थिनींसाठी सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाची घोषणा. राखी बोराडे यांच्या नेतृत्वात संवाद कौशल्य, टीमवर्क, आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन क्लबच्या अध्यक्षा अर्चना उचके, सचिव हिमानी गोयल, आणि प्रकल्प संचालक पी. पी. राखी बोराडे यांनी संयुक्तपणे केले. बबिता अग्रवाल, रंजना पडवेकर, संतोष मित्तल आणि इतर सदस्यांनीही उत्साहाने सहभाग घेत या उपक्रमास यशस्वी केले.
या उपक्रमाद्वारे इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरने केवळ विद्यार्थिनींच्या गरजा भागवल्या नाहीत, तर त्यांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवण्याचा मार्गही दाखवला आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी शिक्षण व जीवन कौशल्य क्षेत्रात क्लबने एक सकारात्मक आदर्श सादर केला आहे.

