#Ghugus
• अकरा लाखांच्या ATM चोरीचा भांडाफोड!
• चंद्रपूर पोलिसांची यशस्वी कामगिरी
सुवर्ण भारत | पंकज रामटेके : सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस : घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँक ऑफ महाराष्ट्र, पंढरकवडा येथील ATM फोडून तब्बल ₹१०,९२,८०० रक्कम चोरीची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला त्वरित तपासासाठी लावले.
घटना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांचा अभ्यास केला, गुन्ह्यात वापरलेल्या बोलेरो वाहनाचा मागोवा घेतला आणि सलग १३ दिवस ९०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्या. या मेहनतीच्या फळस्वरूप, राजस्थानचा सरदार खान (५२) यास तेलंगणातील चिन्नूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने कबुली देताना सांगितले की या गुन्ह्यात त्याचे सहकारीही सहभागी होते साजिद खान राजुद्दीन (हरियाणा), सावलेर (राजस्थान) कला रा. गुमटकी(हरियाणा). या आरोपींचा शोध पोलीस सुरू ठेवत आहेत.
सदर आरोपी सरदार खान याला घुग्घुस पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास चालू आहे. ही संपूर्ण कामगिरी चंद्रपूर गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली . पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तपास अधिकारी आणि पथकांनी एकत्रित प्रयत्न करून हे प्रकरण उघडकीस आणले आहे.

