• मनोज मोडक यांची विदर्भ विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती : पत्रकारितेच्या कार्याचा सन्मान !
• अनेकांनी केले मोडक यांचे अभिनंदन!
चंद्रपूर -किरण घाटे
पुरोगामी पत्रकार संघाच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी भद्रावती येथील वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तथा लाॅर्ड बुद्धा टी.व्ही.चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी मनोज रामदास मोडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ परिश्रम घेत समाजातील वंचित, शोषित, पीडित जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणाऱ्या मोडक यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीची
घोषणा पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी छिंदवाडा येथे नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या कार्यालय उद्घाटन सोहळ्यात केली. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “पत्रकारितेतील पारदर्शकता, सचोटी आणि जनतेसाठी असलेली बांधिलकी पाहूनच मनोज मोडक यांची ही निवड करण्यात आली आहे. विदर्भातील पत्रकार संघटनांना एकत्र आणत संघटनेचे नाव उंचावण्याची क्षमता त्यांच्या कार्यात दिसून येते. त्यामुळे या नियुक्तीमुळे पुरोगामी पत्रकार संघाची ताकद निश्चितच वाढेल.”
यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात मोडक यांचे स्वागत केले. कार्यक्रमात सुर्यवंशी यांनी पुढे बोलताना सांगितले की, “पत्रकार समाजातील चौथ्या स्तंभाचे कार्य प्रामाणिकपणे करतात. मात्र, सध्याच्या बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने आवाज उठविणे अत्यंत आवश्यक आहे. मोडक यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील पत्रकार अधिक बळकट होतील, यात मला शंका नाही.”
मोडक यांना दिलेल्या या जबाबदारीबाबत संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रीयेत सांगितले की, “ही जबाबदारी म्हणजे केवळ सन्मान नसून एक मोठे कर्तव्य आहे. पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडवणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देणे आणि समाज हितासाठी खरी पत्रकारिता उभारणे हेच माझे ध्येय असेल. संघटनेच्या माध्यमातून विदर्भभर पत्रकारांची भक्कम संघटना उभी करण्याचा प्रयत्न राहील.”
छिंदवाडा येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडांगळे , राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे,प्रितमसिंग चौहान, मारूती जाधव ,श्रावण पाटील, प्रदीपकुमार जुलमे, प्रणित भगत,सागर खोब्रागडे यांच्या सह अनेक नामांकित पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन संघाचे पदाधिकारी प्रदीपकुमार जुलमे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.
भद्रावती निवासी
मनोज मोडक यांच्या नियुक्तीबाबत संपूर्ण विदर्भातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांचे यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील पत्रकारांची संघटना अधिक सक्षम होईल आणि पत्रकारांच्या प्रश्नांना ठाम आवाज मिळेल, असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केल्या जात आहे.

