• राजु-यात निघाला काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा !
• शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा-अन्यथा तीव्र आंदोलन करु शासनाला आंदोलनकर्त्यांचा इशारा
• मोर्चात खा.प्रतिभा धानोरकर,माजी आ.सुभाष धोटे, व सुरज ठाकरेंसह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी
सुवर्ण भारत | किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
राजुरा :
विदर्भातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या राजू-यात काल शनिवारी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व विविध रास्त मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला.
शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी मोर्चाला संबोधित करताना म्हटले आहे.“फसवणूक आणि मतचोरी करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवायलाच हवा,” असे ही ते आपल्या भाषणात म्हणाले.
राजुरा तालुका काँग्रेस व सर्व काँग्रेस संघटनांच्या वतीने या आयोजित जनआक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव व लोक उपस्थित झाले होते.
भवानी माता मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा”, “शेतकरी एकता जिंदाबाद”, “फसव्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी शहर अक्षरशः दणाणून गेले होते
माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही जिल्ह्यात अद्याप ओला दुष्काळ घोषीत केलेला नाही. मतचोरी करून निवडून आलेल्या आमदारांची सदस्यता रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी. शेतकरी व सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेसचा लढा सातत्याने सुरू राहील.”
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल करताना सांगितले की, “मतांची चोरी करून सत्तेत आलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी लूट व दिशाभूल करत आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या या सरकारविरुद्ध काँग्रेसचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचेल.”
मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे २७ ठोस मागण्या सादर करण्यात आल्या. यात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करणे, ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देणे, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेणे, बोगस मतदार नोंदणी प्रकरणी कारवाई, खतांचा कृत्रिम तुटवडा दूर करणे, कापूस व सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज, कृषिपंपांना नियमित वीजपुरवठा, अतिक्रमणधारकांना पट्टे, तरुणांना स्थानिक रोजगार, निराधार व वृद्धापकाळ पेन्शन वाढवणे, महिला बचत गटांना व्याजमाफी आणि प्रलंबित रस्ते व जलजीवन मिशनची कामे पूर्ण करणे यासह विविध मागण्ययांचा समावेश होता.
सदरहु निवेदन राजूराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. शासनाने या मागण्या तातडीने मान्य न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसतर्फे या वेळी देण्यात आला
मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कामगार काँग्रेसचे सुरज ठाकरे, सभापती विकास देवाळकर, नानाजी आडे , जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी नगर सेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधू, महिला काँग्रेसच्या निर्मला कुळमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, तसेच विविध फ्रन्टल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

