#Ballarpur
• सार्वजनिक हनुमान मंदिरात कार्तिक महिन्यातील काकड आरती उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : विवेकानंद नगर वॉर्ड येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात कार्तिक महिन्याच्या निमित्ताने काकड आरतीचा वार्षिक धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. ही आरती गेली तब्बल ४५ वर्षे अखंडपणे सुरू असून, यावर्षीही भक्तीमय वातावरणात पार पडली.
या धार्मिक परंपरेचे प्रमुख आयोजक प्रभाकर दूधाळकर, गणपत मटाले, राजू बावणे, अमित मधुकर नवघरे, तानाजी मुरासकर, हनुमान मुरासकर, धांडारे, सतीश रामपुरकर आणि किशोर गोसतवार होते. काकड आरतीचा शुभारंभ कोजागिरी पौर्णिमेला झाला असून समारोप त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आला.
हनुमान मंदिरातून दिंडी यात्रा काढण्यात आली. या दिंडीचा समारोप वर्धा नदीच्या तटावर करण्यात आला. दिंडीत शेकडो महिला व पुरुष भक्तांनी सहभाग घेतला आणि भजन, टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर भक्तीभावाने दुमदुमून गेला.
शेवटच्या दिवशी भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत धार्मिक वातावरण अधिक पवित्र केले.
या प्रसंगी भक्तांनी गेली ४५ वर्षे अखंड चालत आलेल्या या सुंदर परंपरेचे कौतुक करून आयोजकांचा सत्कार केला. काकड आरतीच्या या पवित्र सोहळ्याने संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

