Home Breaking News —– ऊन सावली——-

—– ऊन सावली——-

247

—– ऊन सावली——-

ऊन सावली ही प्रकाशाशी जोडलेली स्थिती आहे. अगदी एका नाण्याच्या दोन विरुध्द बाजू प्रमाणे. नाण्याच्या एका बाजुला उन तर दुसऱ्या बाजूला सावली. सूर्य प्रकाशा मुळे निर्माण होणारी घटना म्हणजे उन. एखाद्या जड वस्तूवर उन पडली तरच त्याची सावली निर्माण होते. म्हणजेच काय तर उन्हा शिवाय सावलीचा जन्मच नाही. हे उन्हाचे चटकेच मानवाला खुप काही शिकवून जातात. जीवनाचे गणित देऊन जातात. ते ज्याचे त्याने सोडवायचे. आपल्या मनातील उन सावली मात्र मानवी भावनांशी जोडलेली असते. ऊन म्हणजे दुःख तर सावली म्हणजे सुखाची छाया. यातील सुखाच्या सावली साठीच मानवाची अविश्रांत चाललेली धडपड आहे. हर घडीला बदलणारी अशी स्थिती आहे. ऊन सावली ही नैसर्गिक घटना असली तरी ती आपल्या जीवनात सुख दुःखाशीही जोडलेली सांसारिक घटना आहे.
ऊन सावली ही नैसर्गिक घटना असून आपल्याला दृश्य स्वरूपात ती अनुभवता येते. दिवस रात्रीचे चक्र जसे आपला क्रम न विसरता नियम पाळतात तसेच त्या अनुषंगाने उन आणि सावलीची निर्मिती होत असते. ऊन आहे म्हणून सावली देखील आहे. समस्त मानव जात ह्याचा अनुभव घेत असते.
ऊन म्हणजे काहीली! उन म्हणजे वनवा! उन म्हणजे चटके! उन म्हणजे उष्णता! ऊन म्हणजे आग! उन मानवावर जरा विपरीत परिणाम करणारी स्थिती. मानवाचा देह उष्ण दाह सहन करू शकत नाही. अंगांगाची लाही लाही होते. घामाच्या धारांनी चिंब भिजून त्याचा देह उष्णतेचा प्रतिकार तर करतोच पण मनातून राग राग करतो. चिडून जातो. हा उष्णतेचा काळ कधी संपतो ह्याची वाट पाहतो. हा असह्य काळ काय असतो ते भोगुनच कळते. अर्थात उन्हाचे चटके भोगणे हा अविभाज्य भाग असला तरी जीवनातला अतिशय कठीण काळ असतो.
उन्हाच्या अगदी विरूध्द असते ती म्हणजे सावली. सावली या शब्दातच शांत आणि गारव्याचे भाव आहेत.
सौख्य आहे. आल्हाद आहे. शीतलता आहे. देहाला हवा असलेला आनंददायी स्पर्श आहे. मन आणि मेंदूला आल्हाद देणारा भाव आहे. म्हणून आपण उताविळ होऊन ही हवी हवीशी सावली शोधत असतो. ही सावली आपल्याला कधी आंब्याच्या आमराईत मिळते तर कधी संत्रा बागेत. तशी ही शेतातल्या गर्द दाट सावली देणाऱ्या वृक्षांच्या खाली सातत्याने उपलब्ध असतेच. तेथे काही काळ बसले तर मनाला होणारा आनंद अवर्णनीय असाच असतो. ही छाया तना मनावरचा ताण विसरायला भाग पडते, म्हणूनच हा वृक्ष सहवास सोडवाच वाटत नाही. अगदी जिवलग सख्या सारखा. हा वृक्ष छायेचा नाद मानवाला खुळा बनवून टाकतो. सावलीतली शीतलता मनाला बिलगून आपले मन सुखद भावनेने बंदिस्त करून टाकते. वृक्षांच्या सानिध्यात तुकाराम महाराजांना हाच अनुभव आला.
म्हणूनच तुकाराम महाराज
*वृक्ष वल्ली आम्हा सोयरे*
हे सांगून गेले.
ऊन सावलीची महती प्रत्यक्ष जशी आपल्या जीवनात आहे,तशीच तिची तुलना आपण जीवनातल्या सुख दुःखाशी करत असतो. सुख सावली प्रमाणे आपल्या जीवनात आनंद, शांती, उत्साह घेऊन येते. हवी हवीशी अनुभूती देऊन जाते. प्रगतीचे पंख लाऊन जाते. नव्या स्वप्नाचे जग आपल्या पदरात टाकून जाते. या सुखाच्या सावलीत आपण रमून जातो. कधी ही सावली यशाच्या,कीर्तीच्या रुपात प्राप्त होते, कधी संपत्ती आणि समृद्धीच्या रुपात मिळते, कधी हव्या हव्याश्या असलेल्या आप्त स्वकियांच्या रुपात मिळते. सुखाचे दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत पण नाही. या उलट दुःखाचे उन जीवाची काहीली करतात. जीव नकोसा करतात. भाव विवश करतात. निराशापूर्ण जिवनापुढे माणूस हताश हतबल होऊन जातो. तो आपले मानसिक स्वास्थ्य गमावून बसतो. दुःखाच्या चिंतनाने जीवन नकोसे होऊन जाते तेव्हा तो जीवन संपविण्याचा प्रयत्न करू लागतो. त्या साठीचे अनेक मार्ग शोधू लागतो. ही मानसिक स्थितीच अशी असते पण अंतस्थ धैर्य राखून, हे दिवस निघून जाण्याची वाट पाहावी लागते. आपली कर्तव्ये आणि आपली जबाबदारी सोडून जाणं ही भ्याड पणाचे ठरू शकते……
सुख दुःखाची उन सावली
येते जाते राग नको…
संकटास लीलया भिडावे
आयुष्याचा त्याग नको…
बहुमोलाचे जीवन वेड्या..
परत फिरूनी मिळते का?..
मना सारखे सारे काही…
जीवनात या घडते का?….
असा संदेश कवी आपल्याला देऊन जातात.
जीवनात सुख दुःखाची उन सावली येतच असते. तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनातले क्षण स्थिर कधीच नसतात. सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून पुन्हा सुखाची सावली येतच असते. गरज आहे आलेले सर्व दिवस चित्तवृत्ती स्थिर ठेवून जगणे. सुखात हुरळून जाऊ नये तर दुःखात कोलमडून जाऊ नये. कारण येणारे दिवस बदलणार असतात. निसर्ग नियमा प्रमाणे आपल्या जगण्याचे काही नीच्छित प्रयोजन असते. आपणही सृष्टीवर काही तरी विशिष्ट काम करण्या साठी जन्माला आलेलो असतो. दैवी संकेत म्हणून जीवनातल्या सुख दुःखाच्या बाजू सांभाळत आपली तारेवरची कसरत सुरू ठेवणे या शिवाय आपल्या हाती काहीच नसते.
जीवन म्हणजे, सुखदुःखाची
ओली सुखी, रंगत असते
आसू आणि हास्याची
अविभाज्य संगत असते ll

🟨✍️सौ. विजया डी.भांगे
पथ्रोट जिल्हा अमरावती.
मो. नं.8788417459