
⬜◾⬜चुका पण शिका ◾⬜
चुकणे हा मानवाचा स्थाईभाव आहे. बालपणापासून मानव चुकत चुकतच, शिकत असतो. कितीही ठरविले तरी वागता बोलतांना नकळत चुका होतात. एक चूक दुरुस्त केली की दुसरी चूक गळ्यात पडते. प्रत्येक वेळी आपण चुका निस्तरत पुढे जात असतो. जेव्हा नवीन काही करण्याचा प्रयत्न आपण करतो; तेव्हा बरेचदा आपले पहिले प्रयत्न फसून चुका होतात. जगण्याच्या प्रयोगशाळेत यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करावे लागतात. त्यात चुका होणे स्वाभाविक आहे. म्हणून आपण प्रयत्न करणेच सोडून देणे योग्य नसते. चुका होत नाहीत असा कोणी नाही. चुका आहेत म्हणूनच जगण्याचे अनुभव आहेत. फरक एवढाच की, काही चुका मोठ्या तर काही चुका नगण्य असतात. काही चुका माणसाच्या जीवावर उठणाऱ्या असतात. अशावेळी खूप शांतपणे विचार करून चूक सुधारणे आवश्यक असते. आपल्या सहवासात आपल्याला आधार देणारे, मदत करणारे, मानसिक स्थिती समजून घेणारी अनेक मंडळी असते. त्यांच्या आधारेच अनेक प्रश्न आपण सोडवत असतो. चुका माणसाची पाठ सोडत नाहीत हे मात्र खरे! छोट्या चुका सहज निस्तारता येतात पण मोठ्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागते.
आपल्या दैनंदिन जीवनात नित्याची कामे करतांना छोट्या छोट्या चुका होतात. त्या टाळण्यासाठी आपल्याला नित्याच्या कामात योग्य तो सराव करणे आवश्यक असते. व्यवसायात चुका टाळण्यासाठी त्यातील कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक असते. अनेक वेळा कठीण निर्णय घेतांना ते चुकतात. कधी वागण्या बोलण्यात चुका होतात. व्यवहार करतांना चुका होतात. व्यवसाय क्षेत्रात चुका ठरलेल्या असतात. कुणी आपल्या कडून दुखावले जाते. अशा अनेक चुका होतात. त्याची टोचणी मनाला लागून जाते. मनात त्याचा सल निर्माण होतो. आपण त्याचा विचार करीत बसतो. मनाला दोष देत बसतो. पाच्छताप करीत बसतो; पण झालेल्या चुका मनातून काढून त्याचा सल कमी करणे आवश्यकच असते. झालेल्या चुकांसाठी मनात अपराधीपणाची भावना घेऊन जगणे ही एक दुसरी चूक असते. कारण अपराधीपणामुळे आपली निर्णयक्षमता कमी होऊन आणखी चुका होत जातात. झालेल्या चुकांवर नेहमीच उपाय असतात. ते शोधून मोकळे व्हावे. कुणाचे मन दुखावले असेल तर माफी मागून मोकळे व्हावे. व्यवहारात तफावत आढळली तर देणे घेणे बरोबर करून मोकळे व्हावे. मोठ्या चुकीसाठी मित्र, नातलग, ज्येष्ठ मंडळी यांचा सल्ला घ्यावा. प्रत्येकच क्षेत्रात झालेली चूक दुरुस्त करता येत असते गरज असते ती त्यावर उपाय शोधण्याची. चुका अनुभव देण्याकरिता येत असतात. शिकण्याची संधी निर्माण करून देत असतात. म्हणून मनावर त्याचे ओझे घेऊन आपण जगू शकत नाही. म्हणून आधी चूक होण्याचे कारण शोधा. पुन्हा तीच किंवा तशा प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्या. मनाला तसा आदेश द्या.
माणूस चुकतो पण तो त्यातूनच शिकतो. चुका आपल्याला शिकवण देण्यासाठीच घडत असतात. एक चूक कितीतरी गोष्टी शिकवून जाते. खूपदा झालेल्या चुका अशा असतात की,त्याची वाच्यता कोणाकडे आपण करू शकत नाही. कुणाला सल्ला मागू शकत नाही त्यामुळे मानव आपले जीवन संपवण्याचे निर्णय घेतो. असे घडू नये म्हणून शांतपणे विचार करावा. घाईत निर्णय घेऊ नये. प्रत्येक प्रश्न त्याचे उत्तर घेऊन जन्माला आलेला असतो. चुकांसाठी माफी मागून, क्षमा याचना करून मोकळे होता येते. चुकांमध्ये धडा देण्याचे खूप मोठे सामर्थ्य असते. चुकाच जगण्या वागण्याचे धाडस वाढवितात. वागण्यात ताळमेळ, संयम, अहंकार अंकुश ठेवला तर कुणाचे मन दुखावले जाणार नाही. सकारात्मक विचार करून निर्णय घेतला तर चूक होणार नाही. बुद्धी स्थिर ठेऊन वागल्याने चुका होण्याचे प्रमाण कमी राहते. चुका निस्तरण्यात अधिक वेळ वाया जात असतो. म्हणून जमेल तेवढ्या कमी चुका होतील असा प्रयत्न करावा. जीवनात पावला पावलावर आव्हान असते. ते पेलवत जगण्याची कठीण परीक्षा द्यावी लागते. सर्वसापेक्ष वर्तन केले, सकारात्मक विचार ठेवला तर चुका टाळणे शक्य असते. मनातील वैफल्याची भावना कमी करणे शक्य होते. चुका दुरुस्त करूनच आपण जगणे शिकत असतो. म्हणून चुकांचा बाऊ न करता, त्या दुरुस्त करत जगा. झालेल्या चुकांमधून शिका. जगणे सहज शक्य होईल.
◾सौ.विजया डी भांगे.
पाथ्रोट, जि.अमरावती
