#Ghugus
• लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन अंतर्गत ‘लॉईड्स आर्ट मेला’ उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत:पंकज रामटेके (सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर)
घुग्घुस: लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता तसेच पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘लॉयड्स आर्ट मेला’ या भव्य चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात घुग्घुस, उसगाव, नकोडा, म्हातारदेवी, बेलसणी, मुरसा, शेणगाव, वढा, धानोरा व पिपंरी परिसरातील जिल्हा परिषद शाळांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या स्पर्धेला घुग्घुस परिसरातील जिल्हा परिषद शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १७ जिल्हा परिषद शाळांमधील ७६४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच सामाजिक व पर्यावरणपूरक विषयांबाबत सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याची संधी प्राप्त झाली.
चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार तीन स्वतंत्र गटांमध्ये घेण्यात आली होती. इयत्ता १ ते २ च्या विद्यार्थ्यांसाठी निसर्ग चित्र रंगविणे हा विषय देण्यात आला होता. लहानग्यांनी निसर्गातील विविध घटक रंगांच्या माध्यमातून साकारत आपली कल्पनाशक्ती प्रभावीपणे मांडली.
इयत्ता ३ ते ५ च्या विद्यार्थ्यांसाठी “सुंदर माझी शाळा” या विषयावर चित्र काढून रंगविण्याची संधी देण्यात आली. या गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील वातावरण, स्वच्छता, वृक्षारोपण व शालेय उपक्रम यांचे सुंदर चित्रण केले.
तसेच इयत्ता ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी “पाणी वाचवा – जीवन वाचवा” हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक व पर्यावरणपूरक विषय निश्चित करण्यात आला होता. या विषयातून विद्यार्थ्यांनी पाणी टंचाई, जलसंवर्धन आणि भविष्यातील जबाबदाऱ्या यांचे प्रभावी दर्शन घडविले.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत निसर्गसंवर्धन, शालेय जीवन आणि पाणी बचतीसारख्या विषयांवर प्रभावी व आशयपूर्ण चित्रांकन सादर केले. विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून सामाजिक भान, पर्यावरणाविषयीची जागरूकता तसेच सर्जनशील विचारधारा स्पष्टपणे दिसून आली.
सदर स्पर्धेचे आयोजन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी तसेच सहायक महाप्रबंधक विद्या पाल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हा उपक्रम अधिक नियोजनबद्ध, प्रभावी व अर्थपूर्ण ठरला.
या चित्रकला स्पर्धेतील प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित शिक्षक, पालक तसेच आयोजकांनी व्यक्त केला.



