सास्ती रेती घाटावर अवैध रेतीची वाहने पकडली ; मध्यरात्री जिल्हा खनिकर्म विभागाच्या पथकाची कारवाई
चंद्रपूर -किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध उत्खनन व वाहतूकीवर अंकुश बसावा तदवतचं अश्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी या साठी चंद्रपूर जिल्ह्यातील तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी महसूल पथक तयार करावे अश्या सूचना या आधीच चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांनी केल्या होत्या.
जिल्ह्यातील सास्ती नदी घाटातून अश्या प्रकारची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा खनिकर्म विभागातील खणीकर्म अधिकारी रोहन ठवरे व भौ.मा.प्र.स.खेलचंद वनकर, शिपाई नागेश यादव तसेच वाहन चालक मनोज जिवतोडे यांनी अख्खी रात्र जागून काढली व जिवाची पर्वा न करता यशस्वी पणे दि.२२जानेवारीला मध्यरात्री सास्ती नदी घाटावर धाड टाकून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांना रंगेहाथ पकडले .लगेच ते वाहने दंडात्मक कारवाई करण्यासाठी बल्हारपूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जमा केले.बल्हारपूर व राजूरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत असताना या दोन्ही कार्यालयातील महसूल पथकांना याची माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते.या पथकांनी आज पर्यंत या कडे जातीने लक्ष पुरविले असते तर मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यां वाहनांवर दंडात्मक कारवाया झाल्या असत्या असे या परिसरातील जनतेत बोलल्या जाते.
चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी व त्यांच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यां रेती माफियांना काल मध्यरात्री चांगलाच धडा शिकवत दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलल्या बद्द्ल जनतेंनी या कारवायांचे स्वागत केले आहे.जिल्हाभरात या पथकाने याच प्रकारे अचानक पणे रेती घाटावर भेटी दिल्यास एक नाही तर अनेक अवैध रेतीचे वाहने मिळू शकतात .
दरम्यान जिल्हा खणीकर्म अधिकारी रोहन ठवरे, खेलचंद वनकर ,नागेश यादव व मनोज जिवतोडे यांनी उपरोक्त अवैध रेतीची वाहने पकडून रितसर त्या वाहनांचा जप्तीनामा केला असल्याचे समजते.



