आभासी जगाचा भस्मासुर: सुसंस्कृतपणाचा लिलाव
प्रा.राजश्री पाटील सुरत
एकेकाळी विचारांचे आदानप्रदान आणि मनोरंजनाचे नितळ साधन असलेले सोशल मीडिया आज एका अशा वळणावर उभे आहे, जिथे ‘संस्कृती’ आणि ‘विकृती’ मधील धूसर रेषा पुसली गेली आहे. सुरुवातीला ज्या व्यासपीठाने सामान्यांना आवाज दिला, तिथेच आज ‘पैसे’ आणि ‘प्रसिद्धी’ या दोन सुळक्यांनी विवेकाचा बळी घ्यायला सुरुवात केली आहे.
जेव्हा एखादे साधन साध्याकडून साध्याकडे न जाता केवळ ‘स्वार्थाकडे’ वळते, तेव्हा त्याचा ‘भस्मासुर’ व्हायला वेळ लागत नाही. आजची स्थिती काहीशी तशीच आहे. लाईक्सच्या मृगजळामागे धावताना अनेकजण आपल्या शील आणि सभ्यतेचे वस्त्रहरण स्वतःच करत आहेत. इथे ना नात्यांचा ओलावा उरला आहे, ना स्त्री-पुरुषाच्या मर्यादेचे भान. कॅमेऱ्यासमोर उभे राहिल्यावर निव्वळ ‘व्ह्यूज’साठी चाललेला हा नंगा नाच म्हणजे आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असलेला मानसिक वैचारिक दारिद्र्याचा प्रकार आहे.
स्वातंत्र्य हे अत्तरासारखे असावे, ज्याचा सुवास दरवळावा; पण आज हेच स्वातंत्र्य उघड्यावरच्या दुर्गंधीसारखे पसरत आहे. “जबाबदारीशिवाय मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे विनाशाचे आमंत्रण असते.” एखाद्या पतंगाने आकाशात उंच भरारी घ्यावी हे कौतुकास्पद, पण दोर तुटला की त्याचे पतन अटळ असते. तद्वतच, जेव्हा समाजमनावर नैतिकतेचे अंकुश राहत नाही, तेव्हा सोशल मीडियावरील हा धुमाकूळ केवळ व्यक्तीलाच नाही, तर संपूर्ण पिढीला उघडे पाडतो.
जर हे असेच सुरू राहिले, तर भविष्यात आपल्याकडे केवळ ‘तांत्रिक प्रगती’ असेल, पण ‘मानवी मूल्ये’ पूर्णतः पायदळी तुडवलेली असतील. प्रसिद्धीच्या या हव्यासामुळे आपण आपली ‘स्वत्व’ गमावून बसू. वेळीच सावध होऊन जर आपण या आभासी जगाला जबाबदारीची जोड दिली नाही, तर पुढच्या पिढीला वारसा म्हणून केवळ एक ‘अश्लील कोलाहल’ पाहायला मिळेल.
प्रा.राजश्री पाटील : सुरत


