#Gadchiroli
• व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन
खेळांसह सर्वच क्षेत्रात युवकांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा : माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज



सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
भामरागड: तालुक्यातील अतिदुर्गम खंडी-नैनवाडी येथे आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या वेळी बोलताना त्यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळांप्रमाणेच शिक्षण, सामाजिक कार्य आणि विकासाच्या सर्वच क्षेत्रात युवकांनी एकजुटीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
अहेरी उपविभागात पूर्वी मोजक्याच क्रीडा स्पर्धा होत असत; मात्र सध्या विविध खेळांच्या स्पर्धा अगदी अतिदुर्गम भागातही मोठ्या प्रमाणावर आयोजित होताना दिसत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असून अशा स्पर्धांमुळे त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत असल्याचेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे खंडी-नैनवाडी येथे प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत तब्बल ४२ संघांनी सहभाग नोंदविला आहे. यावरून ग्रामीण भागातील युवकांचा क्रीडाक्षेत्राकडे वाढता कल स्पष्ट होत आहे.
पुढे बोलताना राजे अम्ब्रिशराव महाराज म्हणाले की, क्रीडा ही मानवी जीवनाची अत्यावश्यक गरज आहे. अशा स्पर्धांमुळे आरोग्याबरोबरच शिस्त, संघभावना आणि एकजूट वाढीस लागते. सुशिक्षित युवकांनी खेळांप्रमाणेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन कार्य केल्यास गावाचा निश्चितच विकास होऊ शकतो.
या उद्घाटनप्रसंगी युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, अर्जुन आलाम (भाजपा तालुका अध्यक्ष, भामरागड), सम्मा कटीया कुडयामी (गाव पाटील), कु. काजल मधुकर दुर्वा (सरपंच, ग्रामपंचायत टेकला), वेलादी सर (ग्रामसेवक) यांच्यासह झाकीर हुसेन, लालसू कोवसी, विनोद एक्का, संतोष कोवसी, अर्जुन टोप्पो, संजय टाप्पो, मनोज मडावी, झुरू मडावी आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

