• सोलर वीज मीटर ग्राहकांना नियमित वीज बिल वितरीत करा
•
ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती, दि.१० (तालुका प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दि.०९ फेब्रुवारीला महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, भद्रावती यांना सोलर वीज मीटर ग्राहकांना नियमित वीज बिल वितरित करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
भद्रावती शहरातील गौतम नगरातील सोलर वीज मीटर ग्राहकांना ऑगस्ट २०२५ पासून वीज बिल वितरित करण्यात आले नाही. याविषयी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीकडे ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींची दखल घेत ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीने उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन सर्व ग्राहकांना सप्टेंबर महिन्यापासूनचे वीज बिल लवकरात लवकर वितरित करावे आणि यानंतर कोणत्याही महिन्याच्या वीज बिलात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच कार्यात कसूर करणाऱ्या खाजगी कंपनीवर योग्य कारवाई करावी. असे स्पष्ट सांगण्यात आले.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव सौ. करूना मोघे, संघटक सोनल वावरे, सदस्य विनोद ठमके व प्रतिक्षा बनकर उपस्थित होते.
