#Ghugus
• लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे कला व हस्तकला कार्यशाळा उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
मुरसा : लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित कला व हस्तकला कार्यशाळा फार्मर ट्रेनिंग सेंटर, मुरसा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या कार्यशाळेत घुग्घुस परिसरातील घुग्घुस व मारडा या दोन केंद्रांतील एकूण २२ जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ७० शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यशाळेला जी. डी. गोएंका लॉयड्स पब्लिक स्कूलचे कला व हस्तकला शिक्षक हरदेवसिंह परमार यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये दडलेली सर्जनशीलता जागृत करत विविध हस्तकला प्रकारांचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले.
कार्यक्रमास लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांनी उपस्थित राहून सहभागींचे मनोबल वाढवले. तसेच लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सीएसआर एजीएम विद्या पाल आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे सेंटर हेड आदित्य कदम यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
ही कार्यशाळा दोन सत्रांत पार पडली. पहिल्या सत्रात ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविण्यात आला. टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त व आकर्षक कलाकृती साकारत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. दुसऱ्या सत्रात हस्तकलेचे शैक्षणिक व व्यावहारिक महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कलाकृती तयार करून घेण्यात आल्या. या सत्रात विद्यार्थ्यांचा उत्साह व कल्पकता विशेष उठून दिसली.
कार्यशाळेनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी फार्मर ट्रेनिंग सेंटरमधील डेमो प्लॉट्सना भेट देऊन आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व शाश्वत कृषी उपक्रमांची माहिती घेतली. कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी प्रत्येक शाळेला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन सर्जनशील विचारांना चालना मिळाली. शिक्षकांनाही उपक्रमाधारित शिक्षण पद्धतीचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन मिळाले.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कला, पर्यावरण जागरूकता व कृषी शिक्षणाचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





