Home Breaking News #Allapalli #Gadchiroli  • एटापल्लीतील रस्त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन • माजी...

#Allapalli #Gadchiroli  • एटापल्लीतील रस्त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन • माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांची आंदोलनस्थळी भेट

147

#Allapalli #Gadchiroli 
• एटापल्लीतील रस्त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन

• माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांची आंदोलनस्थळी भेट

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

एटापल्ली : तालुक्यातील एटापल्ली–देवदा–गडचिरोली, एटापल्ली–जारावंडी तसेच एटापल्ली–हेडरी–गट्टा या प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने बेमुद्दत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी उपोषणस्थळी जाऊन पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या. संबंधित रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्ड्यांचे प्रमाण आणि त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना होत असलेल्या हालअपेष्टा याबाबत आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यासमोर ठोस मांडणी केली.

यावेळी राजे आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजप जिल्हा सचिव मोहन नामेवार, उपसरपंच प्रशांत आत्राम तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.