परिवर्तनशील साहित्य संमेलनात बौद्ध आंबेडकर चळवळीच्या दिशेवर सखोल मंथन : विहार मेश्राम
ब्रम्हपुरी:- परिवर्तनशील साहित्य संमेलनाचे उद्घाटन निखिल बनसोड सर (गोंदिया) यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला सह-उद्घाटक सुवर्णा हुमणे मॅडम, प्रमुख मार्गदर्शक भाग्यवान फुल्लू तसेच संमेलनाध्यक्ष विहार मेश्राम (बुद्ध–शिव–फुले–शाहू–आंबेडकर विचारवंत व युवा सामाजिक कार्यकर्ता, ब्रह्मपुरी) उपस्थित होते. या संमेलनात “आजच्या भारतात बौद्ध आंबेडकर चळवळीची दिशा” या विषयावर अध्यक्षीय भाषण करत विहार मेश्राम यांनी सखोल व परखड मांडणी केली.
आपल्या भाषणात विहार मेश्राम यांनी बौद्ध आंबेडकर चळवळीची ऐतिहासिक पायाभरणी स्पष्ट करत सांगितले की, ही चळवळ अचानक उभी राहिलेली नसून हजारो वर्षांच्या अन्याय, शोषण आणि जातीय अपमानाविरुद्धचा मानवी मुक्तीचा संघर्ष आहे. महाडचा चवदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह आणि संविधान निर्मिती या टप्प्यांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहुजन समाजाला मिळवून दिला, असे त्यांनी नमूद केले.
बौद्ध धम्म आणि आंबेडकरवादाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बौद्ध धम्म म्हणजे केवळ धार्मिक ओळख नसून विवेक, करुणा आणि समतेवर आधारित जीवनपद्धती आहे. आज बौद्ध असणे म्हणजे अंधश्रद्धा नाकारणे, विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारणे, स्त्री–पुरुष समानता मान्य करणे आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणे होय, असे त्यांनी सांगितले.
आजच्या सामाजिक वास्तवावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, संविधान अस्तित्वात असतानाही जातीय अत्याचार, सामाजिक बहिष्कार, आर्थिक शोषण आणि शिक्षणातील असमानता अद्याप संपलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांवर सातत्याने हल्ले होत असल्याने बौद्ध आंबेडकर चळवळीने अधिक संघटित आणि वैचारिकदृष्ट्या स्पष्ट होण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राजकीय दिशेबाबत बोलताना त्यांनी बाबासाहेबांचे राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर समाजपरिवर्तनासाठी होते, हे ठामपणे सांगितले. संविधान सर्वोच्च मानून मूल्याधारित लोकशाही मजबूत करणे आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणे हीच बौद्ध आंबेडकर चळवळीची खरी राजकीय दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण, युवक आणि आर्थिक स्वावलंबन या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि आर्थिक स्वावलंबनावर भर दिला. मुलींचे शिक्षण हे चळवळीचे सर्वात मोठे भांडवल असून, आर्थिक स्वावलंबनाशिवाय सामाजिक स्वाभिमान टिकू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांचे फोटो पूजण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली आहे. आपण इतिहासाचे केवळ वारसदार नसून उद्याच्या भारताचे शिल्पकार आहोत; त्यामुळे परिवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी युगपुरुष युवा मंच, पिंपळगाव खांबी यांच्या वतीने संमेलनाध्यक्ष विहार मेश्राम यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल विहार मेश्राम यांनी युगपुरुष युवा मंचाचे मनापासून आभार मानले व त्यांच्या पुढील सामाजिक, वैचारिक व परिवर्तनशील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारप्रेमी नागरिक उपस्थित होते.
