Home Breaking News • सेलच्या सीएसआर उपक्रमातून बांबू हस्तकला प्रशिक्षण पूर्ण : २५ महिलांना प्रमाणपत्रांचे...

• सेलच्या सीएसआर उपक्रमातून बांबू हस्तकला प्रशिक्षण पूर्ण : २५ महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण • महिलांच्या स्वावलंबनाला नवे बळ; बल्लारपूरमध्ये उत्साहात समारोप सोहळा

119
Oplus_131072

• सेलच्या सीएसआर उपक्रमातून बांबू हस्तकला प्रशिक्षण पूर्ण : २५ महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण

• महिलांच्या स्वावलंबनाला नवे बळ; बल्लारपूरमध्ये उत्साहात समारोप सोहळा

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) अंतर्गत कार्यरत असलेल्या चंद्रपूर फेरो आलोय प्लांट(सीएफपी) च्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बांबू हस्तकला कौशल्य विकास प्रशिक्षण प्रकल्पाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ बल्लारपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमातून २५ महिलांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले.

स्थानिक महिलांना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करता यावीत, त्यांच्या हाताला काम मिळावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनता यावे या उद्देशाने हा प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात आला. सौ. शिखा दास आणि सौ. किरण जुनघरे यांच्या पुढाकारातून ‘सारा बहुउद्देशीय संस्था’च्या माध्यमातून बल्लारपूर शहरातील महिलांना या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

प्रशिक्षणादरम्यान महिलांना बांबूपासून विविध घरगुती वस्तू, सजावटी साहित्य, आकर्षक शोपीसेस, उपयुक्त दैनंदिन वापराच्या वस्तू तयार करण्याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, साहित्य हाताळण्याची पद्धत, डिझाइनची निवड, वस्तूंची बाजारपेठेतील मागणी तसेच विक्री व्यवस्थापन याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये केवळ कलाकुसरीचे कौशल्य नव्हे, तर लघुउद्योग सुरू करण्याची मानसिकताही विकसित झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीएफपीचे कार्यकारी संचालक पी. मुरुगेशन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “सीएसआर उपक्रमांचा मुख्य हेतू समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणे हा आहे. महिलांचे सक्षमीकरण हे राष्ट्राच्या प्रगतीचे मूळ असून, अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळते.”

यावेळी डीजीएम (एचआर) उमेश एम. उके यांनी सीएफपीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सीएसआर उपक्रमांचा आढावा घेत या प्रशिक्षण प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे महिलांना स्थानिक स्तरावर स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करता येतील.

लाभार्थी महिलांमधून शाहिनम परवीन शेख, अंजुम पठाण आणि फौजिया अक्कापकक्का यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आता आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्यास तयार आहोत. बांबू हस्तकलेतून व्यवसाय सुरू करण्याचा आमचा मानस आहे.”

या प्रसंगी सारा बहुउद्देशीय संस्थेच्या सौ. शिखा दास व सौ. किरण जुनघरे यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन केले. नगरसेवक सिक्की यादव, माजी नगराध्यक्ष मुलचांदनी व सौ. चैत्राली मुलचांदनी यांनीही महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक करून भविष्यात अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व २५ महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र स्वीकारताना महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास झळकत होता. यावेळी डी. व्ही. रविचंद्र (जीएम-मेंटेनन्स व प्रभारी सीजीएम-एमएससी), के. सुरेश (सीजीएम-प्रोजेक्ट), आर. डी. गायकवाड (जीएम-वर्क्स), एल. प्रविणकुमार (जीएम आय/सी-एचआर) तसेच सौ. शोभा शिवसंकऱन (जीएम आय/सी-एफ अँड ए) यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास मासे यांनी प्रभावीपणे केले. उपस्थित मान्यवरांचा बांबूपासून तयार केलेले आकर्षक शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सेलच्या या स्तुत्य उपक्रमामुळे स्थानिक महिलांना कौशल्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला असून, भविष्यात अशाच समाजोपयोगी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त होत आहे.