Home Breaking News #Gadchiroli • एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ उत्साहात संपन्न माजी राज्यमंत्री राजे...

#Gadchiroli • एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ उत्साहात संपन्न माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन • भाग्यश्री–धनश्री वाटकर भगिनींच्या भक्ती-संगीताने परिसर मंत्रमुग्ध

183

#Gadchiroli

• एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ उत्साहात संपन्न माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन

• भाग्यश्री–धनश्री वाटकर भगिनींच्या भक्ती-संगीताने परिसर मंत्रमुग्ध

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

एटापल्ली : येथील राजमुद्रा फाउंडेशन, समर्पण ट्रस्ट व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात, भक्तिभाव आणि सांस्कृतिक जल्लोषात संपन्न झाला. शिवजयंतीनिमित्त आयोजित या भव्य सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला राजेशाही दिमाख प्राप्त झाला. शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात ऐक्य, शौर्य आणि संस्कार जोपासण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम तर प्रमुख पाहुण्या म्हणून नगरपंचायत एटापल्लीच्या नगराध्यक्षा रेखाताई मोहुर्ले उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित भक्ती-संगीत आणि भजन संध्येला विशेष आकर्षण ठरल्या त्या सुप्रसिद्ध गायिका कु. भाग्यश्री व धनश्री वाटकर भगिनी. त्यांच्या ओजस्वी आणि सुरेल सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शिवरायांच्या पराक्रम, राष्ट्रभक्ती आणि संस्कृतीचा जागर गाण्यांच्या माध्यमातून उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.

कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राचे राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या सामूहिक गायनाने करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी उभे राहून राज्यगीताला मानवंदना दिली.

यावेळी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत मामीडवार, समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, अमोल गजाडीवार, राहुल कुळमेथे, संपत पैडाकुलवार, मोहन नामेवार, बंटी भाऊ मोहुर्ले, प्रशांत आत्राम, राकेश हिरा, महेशभाऊ पुल्लुरवार, महेंद्र सुल्वावार, प्रशांत तोडेवार यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, एटापल्लीतील ‘शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ हा सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जपणूक आणि शिवप्रेमाचा प्रेरणादायी उत्सव ठरला.