घुग्घूसमध्ये १०० ठिकाणी डस्ट कलेक्टर बसवा : राजुरेड्डी यांची ठाम मागणी
सुवर्ण भारत:पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
घुग्घूस : चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या आणि वाढत्या प्रदूषणामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या घुग्घूस शहरातील हवा सध्या अत्यंत विषारी व जीवघेणी बनली आहे. हवेत मोठ्या प्रमाणात धूळकणांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून डोळ्यांची जळजळ, श्वसनविकार, त्वचारोग तसेच हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण लक्षणीय वाढल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. लहान मुलांमध्ये तर प्रदूषणामुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी घुग्घूस नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती राजुरेड्डी यांनी केली आहे. संपूर्ण शहरात किमान १०० ठिकाणी अत्याधुनिक डस्ट कलेक्टर बसवण्यात यावेत आणि त्यांच्या कार्यक्षमतेची नियमित देखरेख केली जावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
राजुरेड्डी यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी मंडळाची स्थापना केली असली तरी घुग्घूसमधील वाढत्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे व धूळकणांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने कठोर अंमलबजावणीची गरज आहे.
“प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्षात शहरात उपाययोजना राबवाव्यात. डस्ट कलेक्टर बसवणे, रस्त्यांवर नियमित पाणी फवारणी, उद्योगांवर कडक देखरेख आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, शहरातील गंभीर प्रदूषण समस्येकडे तात्काळ लक्ष न दिल्यास नागरिकांना सोबत घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजुरेड्डी यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

