Home Breaking News #Varora • वरोऱ्यात पत्रकारितेचा महोत्सव; तरुण भारतचे पत्रकार श्याम ठेंगडीं यांना जीवनगौरव...

#Varora • वरोऱ्यात पत्रकारितेचा महोत्सव; तरुण भारतचे पत्रकार श्याम ठेंगडीं यांना जीवनगौरव तर  डॉ. प्रफुल्ल खुजे यांना ‘देवदूत’ पुरस्कार 

116

#Varora
• वरोऱ्यात पत्रकारितेचा महोत्सव; तरुण भारतचे पत्रकार श्याम ठेंगडीं यांना जीवनगौरव तर  डॉ. प्रफुल्ल खुजे यांना ‘देवदूत’ पुरस्कार 

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा :लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या हक्क, अडचणी आणि भविष्यातील दिशा यावर मंथन करण्यासाठी ‘स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन’चे राज्यस्तरीय अधिवेशन 21 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे उत्साहात पार पडणार आहे. या अधिवेशनात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दैनिक दैनिक तरुण भारत चे वरोरा तालुका प्रतिनिधी श्याम ठेंगडी यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांना ‘देवदूत पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री  सुधीर मुनगंटीवार  यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून खासदार  प्रतिभा धानोरकर  तर प्रमुख अतिथी म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, वर्धा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे तसेच वरोरा नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

हे अधिवेशन वरोरा येथील नगर भवनात सकाळी 11 वाजता सुरू होऊन दिवसभर चालणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पत्रकार, संपादक, प्रकाशक, मुद्रक, वार्ताहर आणि डिजिटल माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

अधिवेशनात लघु व मध्यम वृत्तपत्रांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, जाहिरात धोरणातील बदल, शासकीय मान्यतेच्या प्रक्रिया, डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत झालेले परिवर्तन, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन व मुक्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सहभागी पत्रकारांना आपले अनुभव, सूचना आणि मते मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्वरशिंग, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष धरमकर, राज्य सचिव आशिष घुमे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जीवन बागडे आणि अभिषेक भागडे यांनी संयुक्तपणे केले आहे.

विविध पुरस्कारांची घोषणा

अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार– अश्विनी पुरी (प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंग)

राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार
डॉ. विश्वास आरोटे (संपादक, दैनिक समर्थ गावकरी, अकोले),
पंढरीनाथ बोकारे (ज्येष्ठ पत्रकार, नांदेड),
राजू पाटील (संपादक, दैनिक मनोगत व द रिंगण लाईव्ह, औसा),
किशोर पाटील (संपादक, दैनिक स्वराज्य तोरण, भिवंडी),
रमाकांत साळुंके (संपादक, साप्ताहिक सिद्धेश्वर संदेश, सोलापूर),
ज्ञानेश्वर धुळे (संपादक, साप्ताहिक कारंजा सामना, कारंजा),
डॉ. मेहबूब मालाबोडी (संपादक, डिपार्टमेंट एक्सप्रेस, कर्नाटक),
नारू (ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार, हैद्राबाद),
विलासकुमार गणपती सिंधे (संपादक, दैनिक हेज्जे गुरुटू, कर्नाटक),
डॉ. सुरेश चिंचोळकर (संपादक, साप्ताहिक बिरसा वार्ता, यवतमाळ),
आनंद शुक्ला (संपादक, साप्ताहिक जागरण, वर्धा),
आणि श्याम ठेंगडी (ज्येष्ठ पत्रकार, दैनिक तरुण भारत, वरोरा).

देवदूत पुरस्कार– डॉ. प्रफुल्ल खुजे (वैद्यकीय अधीक्षक, वरोरा उपजिल्हा रुग्णालय)

राज्यभरातील पत्रकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे हे अधिवेशन पत्रकारितेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.