#Ghugus #chandrapur
• जय भवानी! जय शिवाजीच्या गजराने दुमदुमली घुग्घुस नगरी
सुवर्ण भारत:पंकज रामटेके (सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर)
घुग्घुस : दिनांक १९ फेब्रुवारी — येथील गांधी चौक परिसर गुरुवारी सायंकाळी शिवमय झाला होता. युवा बजरंग क्रिडा मंडळ व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण व भक्तिभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि ‘हिंदवी स्वराज्याचे’ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण व त्रिवार अभिवादनाने झाली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि वातावरणात उत्साहाची लहर संचारली.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, नृत्य-संगीत आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ॲड. दिपक चटप यांच्या ओजस्वी व प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थित नागरिक शिवभक्तीत तल्लीन झाले. शिवचरित्रातील पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्यांनी प्रभावी ऊहापोह केला.
वरिष्ठ मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिवजयंती उत्सवाची परंपरा सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७० मध्ये पुण्यात सुरू केली. त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढत तेथे शिवजयंती साजरी करण्यास प्रारंभ केला. शिवजयंती साजरी करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे शिवरायांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत आणि तरुणाईला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यास सतीश बोंडे, गणेश पिंपळकर, निलेश पिंपळकर, राजेश मोरपाका, दिलीप खांडेकर, शुभम जेऊरकर, गौरव ठाकरे, चंद्रशेखर आभारे, राहुल ठाकरे, राजू काळे, महिपाल कांबळे, गजानन जोगी, विनोद सातघरे, सागर डोहे, चेतन धांडे, प्रवीण ठाकरे, मनोज खोबरे, विपुल खारकर, आशिष गणफाडे, निखिल पर्वतकर, वेदांत पायघन, चेतन जेऊरकर यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, उत्साह, जल्लोष आणि शिवभक्तीच्या वातावरणात घुग्घुस नगरीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.

