#Mul
• बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी आरोपी जेरबंद; ७.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त
• मुल पोलीस ठाणेची धडाकेबाज कारवाई; अवघ्या सहा तासांत गुन्हा उघड
सुवर्ण भारत: सुनील हिंगणकर विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
मूल : तालुक्यातील नांदगाव येथे बांधकामासाठी साठवून ठेवलेले लोखंडी सळई व सिमेंट बॅगा चोरी करणाऱ्या आरोपीला मुल पोलीस ठाणेच्या पथकाने अवघ्या सहा तासांत जेरबंद करत ७ लाख ८२ हजार ६५८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत फिर्यादी गजानन श्रावणजी अंबोकर (वय ३७, रा. आवळगाव, ता. ब्रह्मपुरी) यांनी त्यांच्या नांदगाव येथील कंपनीच्या गोडाऊनमधून लोखंड व सिमेंट चोरीस गेल्याची तक्रार २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांत दाखल केली होती. तक्रारीवरून गुन्हा नोंद करून पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान गोडाऊनमधून १० एमएम स्टीलचे १०० बार (अंदाजे ९.८० टन) तसेच अंबुजा कंपनीच्या ५० सिमेंट बॅगा चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. चोरीस गेलेल्या साहित्याची एकूण किंमत ७ लाख ८२ हजार ६५८ रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय स्रोतांच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या सहा तासांत आरोपीचा माग काढला. श्रीकांत रविंद्र कामिडवार उर्फ रिंकू कमांडिंगवर (वय २८, रा. जाम तुकूम, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. न्यायालयाकडून पीसीआर मिळविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले १० एमएम स्टीलचे १०० बार व ५० सिमेंट बॅगा असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर (क्र. एमएच ३६ जी ८०९१) व ट्रॉली (क्र. एमएच ३४ एल ३६३६) देखील ताब्यात घेण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सबोध वंजारी व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे बांधकाम साहित्य चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.





