#voice of media
• सोलापूरातून राज्यव्यापी दौऱ्याची दमदार सुरुवात
व्हॉईस ऑफ मीडिया मध्ये सहभागी व्हा” – राज्यकार्याध्यक्ष विजय चोरडिया यांचे आवाहन
पत्रकारांसाठी ‘पंचसूत्री’ योजना ठरणार वरदान
सुवर्ण भारत: शंकर महाकाली
सोलापूर : राज्यातील पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याची दमदार सुरुवात सोलापूर येथून झाली. व्हॉईस ऑफ मीडिया” हा नारा देत राज्यकार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी संघटन विस्ताराचा नवा अध्याय सुरू केला असून पत्रकारांसाठी जाहीर करण्यात आलेली ‘पंचसूत्री’ योजना ही राज्यभरातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या राज्यव्यापी दौऱ्याचा मुख्य उद्देश संघटनात्मक मजबुती आणि विस्तार साधणे, जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारिणी अधिक सक्रिय करणे, पत्रकार कल्याणकारी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि राज्यस्तरीय कृती आराखड्यासाठी भक्कम पायाभरणी करणे हा आहे. प्रत्येक जिल्ह्यात नवीन सभासद नोंदणी मोहीम राबविणे, तालुका व शहर कार्यकारिणी स्थापन करणे, प्रलंबित नियुक्त्या पूर्ण करणे तसेच महिला व युवा पत्रकारांचा सहभाग वाढविणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
पत्रकारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पंचसूत्री योजनेत आरोग्य सुविधा, शैक्षणिक सवलती, पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी, डिजिटल पत्रकारिता सक्षमीकरण आणि संघटनात्मक विस्तार या पाच महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन रुग्णालयांशी सामंजस्य करार करून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना ५० टक्के किंवा त्याहून अधिक सवलतीत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तसेच इंग्रजी माध्यम शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधून प्रवेश फी व शिक्षण शुल्कात सवलत, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा आराखडा मांडण्यात आला आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी राज्यभर संघटित लढा उभारण्याचाही निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. डिजिटल पत्रकारितेतील वाढती आव्हाने, कायदेशीर बाबी, सोशल मीडियावरील जबाबदाऱ्या आणि विमा योजना यासंदर्भात जिल्हानिहाय कार्यशाळा आयोजित करून पत्रकारांना सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी सदस्यसंख्या, सक्रिय तालुके, राबविलेले उपक्रम, पत्रकारांच्या अडचणी आणि प्रलंबित प्रश्न यांचा सविस्तर अहवाल राज्य कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
“पत्रकारांची खरी ताकद त्यांच्या संघटनात आहे. व्हॉईस ऑफ मीडिया मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या हक्कांसाठी एकत्र या,” असे ठाम आवाहन विजय चोरडिया यांनी केले. सोलापूरातून सुरू झालेला हा राज्यव्यापी दौरा पुढील काही आठवड्यांत संपूर्ण महाराष्ट्रात पार पडणार असून पत्रकार चळवळीला नवी ऊर्जा आणि नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
आजच्या बैठकीत सोलापूर जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे,जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नदाफ महानगर अध्यक्ष धनराज बंगले ,पंढरपूर तालुका अध्यक्ष सुरज कोलगे ,बनसिद्ध देशमुख ,उर्दू विंगचे जिल्हाध्यक्ष शेख अ मजीद अक्कलकोट तालुका अध्यक्ष हुसेनी नदाफ, मोहोळ तालुकाध्यक्ष विजय पुजारी ,मंगळवेढा तालुका अध्यक्ष रोहिदास भोरकडे आदींची उपस्थिती होती
—————-





