Home Breaking News • दालमिया सिमेंट अपघातातील जखमी कामगारांना २५ लाखांची मदत द्या : आ....

• दालमिया सिमेंट अपघातातील जखमी कामगारांना २५ लाखांची मदत द्या : आ. सुधीर मुनगंटीवार • विधानसभेत लक्षवेधी सूचनेतून प्रश्न उपस्थित; चंद्रपूरमधील वाढत्या कामगार अपघातांवर नियंत्रणासाठी समितीची मागणी

104

• दालमिया सिमेंट अपघातातील जखमी कामगारांना २५ लाखांची मदत द्या : आ. सुधीर मुनगंटीवार

• विधानसभेत लक्षवेधी सूचनेतून प्रश्न उपस्थित; चंद्रपूरमधील वाढत्या कामगार अपघातांवर नियंत्रणासाठी समितीची मागणी

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नारंडा येथे असलेल्या दालमिया सिमेंट कंपनीत सल्फ्युरिक अॅसिड टँकर लोडिंगदरम्यान झालेल्या अपघातात दोन कामगार जखमी झाल्याच्या घटनेवरून राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत जखमी कामगारांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या कामगार अपघातांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

लक्षवेधी सूचनेत आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये सल्फ्युरिक अॅसिड टँकर लोडिंग प्रक्रियेदरम्यान झालेल्या अपघातात अक्षय कन्नाके आणि स्वाती उईके हे दोन कामगार गंभीर जखमी झाले. या कामगारांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी कंपनीने घ्यावी आणि त्यांना किमान २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २५ कामगारांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे नमूद करत ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा अशा अपघातांमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तसेच न्यायालयांमध्ये प्रकरणे प्रलंबित राहिल्याने कामगारांना न्याय मिळण्यास विलंब होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

कामगारांच्या सुरक्षेसाठी विद्यमान कायद्यांचा सखोल अभ्यास करून आवश्यक ते बदल करण्याची गरज असल्याचे नमूद करत या विषयावर आमदारांची अभ्यास समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या कामगार अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांची संयुक्त समिती स्थापन करून तातडीने बैठक घेण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.

दरम्यान, अपघातानंतर जखमी कामगारांची विचारपूस करण्यासाठी कंपनीचे अधिकारी रुग्णालयातही गेले नसल्याची बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सभागृहात नमूद केले.

यावर उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, दालमिया सिमेंट लिमिटेडमध्ये सल्फ्युरिक अॅसिड टँकर लोडिंगदरम्यान झालेल्या अपघातात अक्षय कन्नाके व स्वाती उईके हे कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर जखमी कामगारांना कंपनीकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळेल, यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असे मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्यात येईल आणि अधिवेशनानंतर चंद्रपूरमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.