#Chandrapur
• चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा नियमित सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नियमित सुरू करण्यात यावी तसेच योजनेचे प्रलंबित वीज देयक तात्काळ भरून सात गावांची नळपाणी योजना सुरळीत सुरू करावी, या मागणीसाठी शिखर समितीच्या वतीने दि. ४ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.
चिंचाळा प्रादेशिक नळपाणी योजनेत चिंचाळा, नागाळा, महाकुर्ला, वांढरी, धानोरा, सिदूर व वेंडली या सात गावांचा समावेश आहे. मात्र, सुमारे ३३ लाख रुपयांचे वीज बिल थकबाकी राहिल्यामुळे दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी या सर्व गावांतील नागरिकांना पेयजलापासून वंचित राहावे लागत असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने या ज्वलंत प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित वीजबिलाचा भरणा करावा व सातही गावांतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपा तालुकाध्यक्ष विनोद खेवले, शिखर समितीचे अध्यक्ष प्रकाश शेंडे, भारत रोहने व प्रकाश अल्वलवार यांचा समावेश होता.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी या समस्येची दखल घेत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.




