मध्यरात्रीच्या भीषण आगीत तीन कुटुंबांचे संसार राख; राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची तात्काळ मदत
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
अहेरी : तालुक्यातील जोगनगुडा (उमानूर) येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन कुटुंबांचा संसार अक्षरशः राखेत मिळाला. काही क्षणांतच घरातील धान्यसाठा, कपडे, भांडी, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली; मात्र या घटनेमुळे बोरुकुट कुटुंबीय उघड्यावर आले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अहेरी तालुका मुख्यालयापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगनगुडा (उमानूर) येथे मलय्या शंकर बोरुकुट, प्रसादराव शंकर बोरुकुट आणि नागेश शंकर बोरुकुट ही तीन कुटुंबे एकत्र राहत होती. ३ मार्च रोजी रात्री सर्व कुटुंबीय जेवण करून झोपले असताना मध्यरात्री अचानक घराला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले.
आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरड करत कुटुंबीयांना जागे केले. वेळीच घराबाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली; मात्र घरातील धान्यसाठा, कपडे, भांडी, रोख रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य काही मिनिटांत जळून खाक झाले. आयुष्यभराची कमाई डोळ्यादेखत राखेत मिसळल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. भाजप तालुका अध्यक्ष विकास तोडसाम आणि उपाध्यक्ष संजय अलोने यांच्या मार्फत आपदग्रस्त कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत पोहोचविण्यात आली. तसेच कुटुंबीयांना धीर देत या कठीण प्रसंगात आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तातडीच्या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून गावकऱ्यांनीही त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्या – राजे अम्ब्रिशराव आत्राम
जोगनगुडा येथील आगीत तीन कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्वरित पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.





