#WCL #Ghugus
• वेकोलीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सीएसआर अंतर्गत क्रीडा शिबिराचे आयोजन करावे : राजु रेड्डी
सुवर्ण भारत:पंकज रामटेके

( सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)
घुग्घूस :शहरातील वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विशेषतः नवीन पिढी मोबाईलच्या आहारी जात असल्याने त्यांना मैदानी खेळांकडे वळविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी येत्या उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा घुग्घूस नगरपरिषदेचे शहर उपाध्यक्ष राजुरेड्डी यांनी वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजुरेड्डी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, वेकोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे सीएसआर निधीतून सुमारे ४०० ते ५०० शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स शूज, टी-शर्ट, पॅन्ट तसेच पौष्टिक आहार व शीतपेयांचे वितरण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षी या क्रीडांगणावर विविध क्रीडा शिबिरांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात येते. त्यामुळे यावर्षीदेखील शहरातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल, अशी व्यापक व्यवस्था करून हे शिबिर आयोजित करावे, अशी विनंती राजुरेड्डी यांनी केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण होऊन त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




