• तेलंगणात २९ मार्चला सद्गुरू दादाश्री महाराजांचा महासत्संग सोहळा
• सूक्ष्मध्यान साधना शिबीरासह भक्तिमय वातावरणाची निर्मिती
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर : मुक्तेश्वरी गुरुपीठाचे प. पू. सद्गुरू दादाश्री महाराज यांच्या पावन सानिध्यात तेलंगणा विभागात रविवारी, दि. २९ मार्च २०२६ रोजी भव्य आध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कवडाला येथील कन्यका परमेश्वरी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात सूक्ष्मध्यान साधना शिबीर व महासत्संगाचा लाभ साधकांना मिळणार आहे. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय, शांततामय व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता सूक्ष्मध्यान साधनेने होईल. सुमारे दोन तास चालणाऱ्या या ध्यान सत्रात साधकांना अंतर्मनाशी संवाद साधण्याची व आत्मिक उन्नती साधण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली महासत्संग रंगणार असून जीवनमूल्ये, अध्यात्म व साधनेचे महत्त्व याविषयी अमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे.
महासत्संगानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्गुरूंच्या सानिध्यात ध्यान व सत्संगाचा लाभ घेणे ही साधकांसाठी एक अनमोल आध्यात्मिक अनुभूती मानली जाते. या पार्श्वभूमीवर तेलंगणा विभागातील सर्व साधक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





