Home Breaking News घुग्घूस नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांविरोधात सत्ताधाऱ्यांचा संताप; निषेध आंदोलनाने घेतला उग्र रूप

घुग्घूस नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांविरोधात सत्ताधाऱ्यांचा संताप; निषेध आंदोलनाने घेतला उग्र रूप

158
Oplus_131072

घुग्घूस नगरपरिषदेत मुख्याधिकाऱ्यांविरोधात सत्ताधाऱ्यांचा संताप; निषेध आंदोलनाने घेतला उग्र रूप

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : शहरातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळूनही तब्बल तीन महिने उलटून गेले, तरीही विकासकामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर मंगळवार, ३१ मार्च रोजी घुग्घूस नगरपरिषदेच्या प्रांगणात मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध आंदोलन छेडले.

नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजुरेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे, स्वच्छता सभापती नूरूल सिद्दीकी तसेच महिला व बालकल्याण सभापती माला मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना २०२५-२६’ आणि ‘महाराष्ट्र नगरोउत्थान महाअभियान’ अंतर्गत जवळपास एक कोटी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. मुख्याधिकारी रांजनकर यांनी जाणूनबुजून वेळकाढूपणा करत पाठपुरावा न केल्याने आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना योग्य सूचना न दिल्याने हा निधी वापरात आला नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, शहरातील अनेक विकासकामे रखडली असून नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवरही जोरदार टीका केली. शहराच्या विकासाशी निगडित महत्त्वाच्या विषयांकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष व सभापतींना विश्वासात न घेणे, कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे आणि सायंकाळी उशिरा येऊन ठेकेदारांशी बंद दाराआड बैठक घेणे, अशा प्रकारांवरही आक्षेप नोंदवण्यात आला.

शहरातील मुख्य मार्गांवर लोकवस्तीमध्ये देशी दारू भट्ट्यांना परवानगी देण्यात आल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला. याशिवाय नगरसेवकांना जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे, सोलर यंत्रणा निकामी ठरल्या आहेत, तर वॉटर एटीएम बंद अवस्थेत असतानाही दुरुस्तीची बिले ठेकेदारांना अदा केली जात असल्याचे आरोप करण्यात आले.

या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना तात्काळ निलंबित करावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात स्थायी समिती सदस्य सूरज कन्नूर, नगरसेवक दिलीप पिट्टलवार, नगरसेविका वैशाली चिकनकर, आशा पानघाटे, अर्चना सारोकर, पल्लवी घुले, सुनीता मंदेश्वर पेंदोर, तसेच बाळू चिकणकर, गणेश पाणघाटे, प्रशांत सारोकर, प्रकाश निषाद, बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, सुनील पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.