Home Breaking News माणूसच माणसाचं खरं औषध

माणूसच माणसाचं खरं औषध

48

माणूसच माणसाचं खरं औषध

निसर्गाच्या अफाट पसऱ्यात ईश्वराने अनेक किमया निर्माण केल्या आहेत. आजचे युग हे विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे सुवर्णयुग मानले जाते. शरीराच्या व्याधींवर उपचार करण्यासाठी आपण अत्याधुनिक रुग्णालयांच्या झगमगाटाकडे धाव घेतो, महागडी औषधे विकत घेतो आणि यंत्रांच्या साहाय्याने आरोग्याचा शोध घेतो. परंतु, विज्ञानाच्या या गदारोळात आपण एक सत्य विसरतो की, मनाच्या जखमांवर आणि आयुष्याच्या थकव्यावर जगातील कोणत्याही औषधाच्या दुकानात इलाज मिळत नाही. तिथे केवळ माणूसच माणसाच्या कामी येतो. म्हणूनच म्हटले जाते ..

औषधे उपचार केवळ शरीराची सावडतात ओढ,
माणसाच्या मायेनेच मिळते जगण्याला खरी गोड.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, हे आपण पुस्तकात वाचतो; पण त्याचा खरा अर्थ संकटाच्या वेळी उमजतो. जेव्हा निराशेचे काळे ढग आयुष्याच्या क्षितिजावर दाटून येतात, तेव्हा एखाद्या मित्राने खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात हा कोणत्याही ‘अँटी-डिप्रेशन’ गोळीपेक्षा अधिक प्रभावी ठरतो. शब्दांचे मलम हे औषधांच्या लेपापेक्षा अधिक खोलवर झिरपते. व्याधीने ग्रासलेल्या रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनपेक्षा त्याच्या जिवलगाने दिलेल्या “तू लवकर बरा होशील” या शब्दांतून अधिक ऊर्जा मिळते.

आयुष्याच्या प्रवासात कधी कधी दुःखाचे काटे इतके टोचतात की चालणे कठीण होऊन बसते. अशा वेळी केवळ एक आपुलकीची विचारपूस अमृतासारखे काम करते.

शब्दांच्या फुंकरने निवळतात मनातील सारे दाह,
माणसातच दडलेला असतो माणुसकीचा प्रवाह.

आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘रीतेपण’ अर्थात एकाकीपणा हा सर्वात मोठा आजार बनला आहे. या आजारावर ‘व्हर्च्युअल’ जगातील लाईक्स किंवा कमेंट्स औषध ठरू शकत नाहीत. तिथे प्रत्यक्ष भेटीची ऊब आणि डोळ्यांतील ओलावाच काम करतो. हसण्याने रक्ताभिसरण वाढते असे विज्ञान सांगते, पण ते हसू खुलवण्यासाठी समोर एखादा ‘माणूस’ असावा लागतो. दुःखाचे डोंगर जेव्हा कोसळतात, तेव्हा केवळ खांदा देणारा माणूसच त्या डोंगराचे वजन हलके करू शकतो.

खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर माणुसकी हाच एक मोठा ‘हेल्थ इन्शुरन्स’ आहे. जेव्हा रक्ताची नाती आणि पैशांची श्रीमंती फिकी पडते, तेव्हा केवळ एखाद्या अनोळखी माणसाने दाखवलेली सहानुभूती जगण्याची नवी उमेद देऊन जाते. प्रेमाचे दोन शब्द, आलिंगनाची ऊब आणि ‘मी आहे ना’ हा विश्वास, हीच मानवी आयुष्यातील सर्वात मोठी संजीवनी आहे.

शेवटी, निसर्गाचा नियम असा आहे की, लोखंडाला लोखंडच कापते आणि माणसाला माणूसच सावरतो. बाह्य उपचारांनी शरीर सुधारेलही, पण आत्मा तृप्त होण्यासाठी माणसाला माणसाच्या मायेचीच गरज लागते.

यंत्रांच्या जगात हरवू नको तू स्वतःचे भान,

माणूसच माणसाचे औषध, हेच सृष्टीचे विधान.

🔲प्रा.राजश्री पाटील
सहज सुचलं लेखिका *सुरत*