वाट पाहता पाहता……!

“वाट पाहणे” हे मानवी जीवनातील, मनाला व्याकुळ करून टाकणारे क्षण असतात. वाट पाहता पाहता जीव जेव्हा कासावीस होतो, तेव्हा कुणाचीतरी वाट पाहणे किती कठीण असतं हे कळून जातं. जन्मा पासून मृत्यूपर्यंत वाट पाहण्याचे क्षण मानवाच्या वाट्याला आलेले असतात. अगदी जन्मजात बाळ देखील, आपली भूक भागविण्या साठी आई आपल्या मुखात कधी अमृत थेंब टाकते, याची वाट पाहते आणि मृत्यू शय्येवर जीर्ण झालेल्या शरीराने मरणासन्न अवस्थेत व्यक्ती; आपली सुटका व्हावी म्हणून मरणाची वाट पाहत असतो. अर्थात वाट पाहणे कठीणच. जो पर्यंत आपल्याला हवी असलेली गोष्ट आणि इच्छा प्राप्त होत नाही, तो पर्यंत वाट पाहण्याची मनाची तगमग थांबत नाही.
वाट पाहणे म्हणजे, भावविव्हळ होणे. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींची आपण प्राण कंठात आणून वाट पाहत असतो. मानवी मनाच्या कितीतरी गरजा, वाट पाहणे या प्रकारात लपलेल्या असतात. बालपणात आईचा सहवास खूप आवडता असतो. जरा मोठे होता, मित्र मैत्रिणींचा सहवास प्रिय होऊन बसतो. किशोरवयात भिन्नलिंगी आकर्षणातून होणारी मैत्री जेव्हा वाट पहायला लावते, तेव्हा मनाची होणारी तळमळ फार जीवघेणी असते. अगदी……
थकलेरे डोळे माझे
वाट तुझी पाहता…
नी रात्रंदिन जगता…..
नव तारुण्यात, मुले मुली, मानसिक परिपक्वता नसल्यामुळे, वाट पाहण्याची मर्यादा ओलांडून, सोबत राहता यावे म्हणून चुकीचे निर्णय घेऊन, पळून जाणे सुद्धा मान्य करतात. त्याचे परिणाम चांगलेच होतात असे सांगता येत नाही. असा हा वाट पाहण्याचा भाग मन आणि भावना यांना गोंधळात टाकणारा असतो.
जीवनातल्या प्रत्येक क्षणी आपण कुणाची तरी वाट पाहत अधीर झालेले असतो. आपली दिनचर्या अशीच ठरलेली असते. प्रत्येक काम आपली वाट पाहत असते. एकेका कामाला न्याय देत असता आपण देखील कामातून कधी मोकळे होतो याची वाट पाहत असतो. कामातून मोकळे झाल्यानंतर आराम करायला वेळ मिळावा म्हणून वाट पाहतो. आपले सर्व काम झाले की, आपली पिल्ले शाळेतून घरी येणार, कारभारी कामावरुन परत येणार म्हणून वाट पाहतो. यात आपल्या लोकांच्या घरी येण्याच्या वेळात थोडा वेळ लागला की, आपला जीव घाबरा होतो. मनावर ताण येतो. अगदी थोडा वेळात किती तरी विचार मनात चिंता निर्माण करतात. “मन चिंती, ते वैरी न चिंती”, अशी मनाची अवस्था होऊन जाते. एकंदरीत वाट पाहण्या इतके कठिण काम कोणतेच नसावे!
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवा विषय आपल्याला नव्या नव्या गोष्टींची वाट पाहायला लावते. लग्नाला आलेली मुले मुली ज्या घरात असतात ते, आपल्याला योग्य जोडीदार मिळावा म्हणून वाट पाहतात. मायबाप, आपल्या अपत्यांची लग्न चांगल्या घरात व्हावीत म्हणून, त्यांचे भले व्हावे म्हणून, वाट पाहतात. लग्न झालेले जोडपे जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत म्हणून वाट पाहतात. ते आपल्या घरात नव्या जीवाच्या आगमनाची वाट पाहतात. नव्या जीवाला वाढविताना त्याचे मोठे होणे, यश मिळविणे, त्याचे कौतुकाचे क्षण पाहायला मिळणे, त्याचे भविष्य यशस्वी होण्याची वाट पाहणे, त्याच्या जोडीदाराचे स्वप्न रंगविणे आणि त्या दिशेने प्रयत्न करणे हे सारे वाट पहायला लावणारे क्षण असतात.
जीवनाच्या लढाईत प्रत्येकजण पुढच्या क्षणाची वाट पाहतो. शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन पीक पाण्याचं नियोजन करून, नफ्याची वाट पाहतो. उद्योजक आपल्या धंद्यात यश कसे वाट्याला येईल याची वाट पाहतो. कर्मचारी पगारवाढीची वाट पाहतो. संसारात यशस्वी होणारा सूत्रधार जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्याची वाट पाहतो. विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहतो. आपली डिग्री पूर्ण करून नोकरी कधी लागेल याची आतुरतेने वाट पाहतो. नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्या लेकरांची वाट, सणासुदीच्या दिवसात आई, खूप आतुरतेने पाहते. माहेरी येणाऱ्या लेकीची वाट, तिची आई दाराकडे डोळे लाऊन पाहते. नवदाम्पत्य आपल्या मिलनाचे क्षण कधी साधतात याची वाट पाहतात तर; उज्ज्वल भविष्यासाठी सगळेच डोळ्यात तेल घालून यशाची वाट पाहतात.
हे वाट पाहणे सोपे नसते. यात माणसाची भरपूर शक्ती कामी लागते. अनेक चढ उतार त्याला झेलावे लागतात. जीवाची तगमग सहन करावी लागते. अपयश पचवितांना मानसिक त्रासाला समोरी जावे लागते. वाट पाहणे हा सरळ मनाला भिडणारा विषय असल्याने, तो भार मनाला पेलावावा लागतो. हा युद्धाचा प्रसंग झेलत माणसाचे आयुष्य पुढे सरकत असते. अगदी वाट पाहत…..अगदी…
वाट बघून झुरते धरती
मग दरियाला येते भरती…
अगदी असेच होते. वाट पाहणे वाया जात नाही; आपल्याला हवे असते ते अखेर होतेच पण प्रतीक्षा मात्र करावीच लागते…
🔲सौ.विजया डी. भांगे
पाथ्रोट, अमरावती
मो.न.8788417459




