जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले घुग्घुस शहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस : दिनांक १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच शहरातील विविध बौद्ध विहार, तसेच सेवा केंद्रे, सामाजिक व राजकीय कार्यालयांमध्ये सामूहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तहसील कार्यालयासमोरील पुतळ्याजवळ हजारो अनुयायी एकत्र येत मानवंदना दिली. यानंतर काढण्यात आलेल्या भव्य रॅली व मिरवणुकीत ‘एकच साहेब… बाबासाहेब’ तसेच ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
संध्याकाळी शहरात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे वातावरणात जल्लोष पाहायला मिळाला. मुख्य रस्त्यांवर आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी उसळली होती.
गांधी चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर निघालेल्या मिरवणुकीचा समारोप नवबौद्ध स्मारक समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ करण्यात आला. या ठिकाणी विविध सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच शहरातील विविध चौकांमध्ये नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, शीतपेय, अन्नपदार्थ आदींचे वाटप करण्यात आले. महिलांसह युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमांमध्ये दिसून आला.
यावेळी नागरिकांनी बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत ‘शिक्षण, संघटन आणि संघर्ष’ हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले.
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायल्याशिवाय राहणार नाही,” तसेच “हक्क मिळवायचे असतील तर संघर्ष करावा लागतो,” या विचारांची आठवण करून देत उपस्थितांनी अभिवादन केले.
तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

