सामाजिक व चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मंगेश रेगुंडवार यांना महाराष्ट्र साई “पद्मश्री पुरस्कार”
सुवर्ण भारत:किरण घाटे विदर्भ प्रदेश प्रतिनिधी
बल्लारपूर : साईनगरी शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठान तथा बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई “पद्मश्री पुरस्कार” सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. न्यू रिंग रोड, सिटी मार्केट शेजारील परिवार लॉन्स बॅन्क्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमास राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणात संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात तब्बल २७५ मान्यवरांना महाराष्ट्र साई “पद्मश्री पुरस्कार” प्रदान करण्यात आला. साईबाबांच्या पवित्र भूमीत, साईंच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी सामाजिक, राजकीय, कामगार, पत्रकारिता तसेच चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय आणि बहुमोल योगदान दिल्याबद्दल मंगेश अशोक रेगुंडवार यांना महाराष्ट्र साई “पद्मश्री पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना सहकुटुंब प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे मित्रपरिवार, सहकारी तसेच शुभचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या भव्य पुरस्कार सोहळ्यास सुमारे १००० ते १२०० नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमात नामवंत समाजसेवक, प्रसिद्ध उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. विविध सांस्कृतिक सादरीकरणे, सन्मान सोहळे आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
विशेष म्हणजे, या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार सोहळ्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली असून, हा सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंगेश रेगुंडवार यांनी आयोजक सुदामजी संसारे तसेच संपूर्ण आयोजन समितीचे मनःपूर्वक आभार मानले. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे सन्मानित केल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


