Home Breaking News _शेगाव हादरले: क्षुल्लक वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या, ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा...

_शेगाव हादरले: क्षुल्लक वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या, ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा सवाल आरोपीला 1 तासात अटक, 102 गावांसाठी अपुरे पोलीस बळ?_

69
Oplus_131072

_शेगाव हादरले: क्षुल्लक वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या, ठेकेदाराच्या

हलगर्जीपणावर ग्रामस्थांचा सवाल

आरोपीला 1 तासात अटक, 102 गावांसाठी अपुरे पोलीस बळ?_

रिपोर्टर : राजेश येसेकर

वरोरा / शेगाव बु  : शेगाव बु. येथील आष्टा बायपास रोडवर आज सकाळी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका 65 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. नाले सफाई करणाऱ्या दोन कामगारांमधील भांडण सोडवायला गेलेल्या विश्वनाथ परसराम कांबळी, वय 65, रा. शेगाव यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र रमेश भुरे, वय 36, रा. दहेगाव जोशी, ता. पारशिवनी, जि. नागपूर हा शेगाव येथे नाले सफाईचे काम करीत होता. आज सकाळी त्याचे सहकाऱ्यासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण सुरू झाले. वाद विकोपाला गेल्याचे पाहून विश्वनाथ कांबळी यांनी मध्यस्थी केली. याचा राग येऊन आरोपी महेंद्र भुरे याने दगडाने कांबळी यांच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या कांबळी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी पळून जात असताना जमावाने त्याचा पाठलाग सुरू केला. माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत अवघ्या एका तासात आरोपीला अटक करून बेड्या ठोकल्या.

*ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर सवाल*

या घटनेने नाले सफाईचा ठेका देण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहितीनुसार, हा ठेका माजी ग्रामपंचायत सदस्याच्या निकटवर्तीयाला देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित ठेकेदाराकडे काम करणाऱ्या मजुरांची कुठलीही नोंद किंवा माहिती उपलब्ध नाही. याबाबत विचारणा केली असता ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली.

“ग्रामपंचायत जर काम देताना ठेकेदार निवडीत हलगर्जीपणा करत असेल, तर उद्या यापेक्षा गंभीर घटना घडली तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

*पोलिस यंत्रणेवर ताण*

शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 102 गावे येतात. मागील काही दिवसांपासून परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. अपुऱ्या पोलीस बळामुळे गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने शेगाव पोलीस ठाण्यात कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.