Home Breaking News ब्रम्हपुरीत देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा 

ब्रम्हपुरीत देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा 

60

ब्रम्हपुरीत देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा 

सुवर्ण भारत: रवि चामलवार (प्रतिनिधी, ब्रम्हपुरी)

Oplus_131072

ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी परिसर असलेल्या फाशी चौक भागात सुरू असलेल्या एका देहव्यापाराच्या अड्ड्यावर ब्रम्हपुरी पोलिसांनी गुरुवारी (१४ मे) संध्याकाळी धाडसी छापा टाकला. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने (DB) रचलेल्या बनावट ग्राहकाच्या जाळ्यात मुख्य महिला दलाल रंगेहात अडकली. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल व इतर साहित्य जप्त केले असून, दोन आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

१४ मे रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, फाशी चौक परिसरातील भोयर यांच्या घरात छुप्या पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवला जात आहे. सार्वजनिक ठिकाण, शाळा आणि निवासी वस्तीजवळ सुरू असलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ दोन महिला समाजसेविकांना पंच म्हणून पाचारण केले आणि छाप्याची आखणी केली. गुन्हे पथकातील एका पोलीस अंमलदाराला साध्या

गणवेशात घटनास्थळावर पाळत ठेवण्यासाठी आधीच रवाना करण्यात आले. त्यानंतर बनावट ग्राहक (Dummy Customer) बनवून तयार करण्यात आले. पोलिसांमार्फत त्याच्याकडे ५०० रुपयांच्या चार चिन्हांकित नोटा सोपवण्यात आल्या. ठरलेल्या संकेतानुसार, बनावट ग्राहकाने घरात प्रवेश करून व्यवहार निश्चित केला आणि पोलिसांना व्हॉट्सअॅपवर ‘OK’ असा संदेश पाठवला. संदेश मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, सपोनि शितल खोब्रागडे आणि अंमलदारांच्या पथकाने घरात प्रवेश केला. यावेळी तिथे घराची मालकीण आणि एका खोलीत बनावट ग्राहक व एक महिला आढळून आले. महिला अंमलदारांमार्फत घेतलेल्या अंगझडतीत मुख्य दलाल महिलेकडून पोलिसांनी बनावट ग्राहकाने दिलेल्या चिन्हांकित नोटा आणि १०,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त केला. तसेच खोलीतून इतर रोख रक्कम, रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि आक्षेपार्ह साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत समोर आले की, मुख्य आरोपी महिला व तिचा पती हे दोघे मिळून बाहेरील भागातून येणाऱ्या गरजू महिलांच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा घ्यायचे. ग्राहकांकडून १,००० रुपये वसूल करून, त्यातील अर्धी रक्कम स्वतः ठेवायचे आणि अर्धी रक्कम संबंधित पीडित महिलेला द्यायचे, अशी कबुली दलाल महिलेने पंचांसमक्ष दिली. हा संपूर्ण अनैतिक प्रकार सम्राट अशोक चौक आणि सावित्रीबाई फुले शाळेसारख्या सार्वजनिक व शैक्षणिक ठिकाणापासून अवघ्या २०० मीटरच्या आत सुरू होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रवीण भोयर याची पत्नी (वय ३४) आणि आरोपी प्रवीण अनिल भोयर (वय ३६, दोघे रा. फाशी चौक, ब्रम्हपुरी) यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ (PITA) च्या कलम ३, ४, ५ आणि ७ अन्वये ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहे.