मानधन रखडल्याने आशा स्वयंसेविका आर्थिक संकटात; ऑनलाईन कामाची सक्ती थांबवण्याची मागणी
चंद्रपूर -किरण घाटे

केंद्र सरकारकडून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन ऑक्टोबर २०२५ पासून थकित असल्याने या कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. हे थकित मानधन तातडीने देण्यात यावे, आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, तसेच गट प्रवर्तकांना कंत्राती कर्मचारी म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपूर येथील अखिल खेडुले कुणबी समाज सभागृहात आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात मानधन न मिळाल्यास देशव्यापी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य महासचिव कॉम्रेड श्यामजी काळे यांनी दिला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेत्या कॉ. ज्योती अंडरशहरे होत्या. मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. यावेळी उपस्थित अनेक आशा व गट प्रवर्तकांनी आठ महिन्यांचे मानधन रखडल्याने ‘आम्ही जगायचे कसे?’ असा संतप्त सवाल करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सरकारला वारंवार निवेदने देऊनही या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.
मेळाव्यात आशा स्वयंसेविकांवर लादल्या जाणाऱ्या ऑनलाईन कामाच्या वाढत्या ताणावरही बोट ठेवण्यात आले. लाभार्थ्यांच्या याद्या, ओळख पडताळणी, ७० वर्षांवरील नागरिकांची माहिती आणि वंध्यत्व कार्ड यांसारख्या कामांची सक्ती केली जात आहे. परंतु, बहुतांश आशांकडे साधे मोबाईल फोन असल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने जोपर्यंत अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल, सिमकार्ड आणि डेटा पॅक उपलब्ध करून दिला नाही, तोपर्यंत ऑनलाईन कामाची सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करावे किंवा सेवानिवृत्तीनंतर दरमहा पाच हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, अशी आग्रही मागणी मांडली गेली.
याशिवाय प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा थकित मोबदला देणे, प्रसूती व आजारपणाची भरपगारी रजा मंजूर करणे, विनामोबदला कामे करून घेणे बंद करणे आणि जीपीएस कॅमेरा मोबाईलद्वारे फोटो काढण्याची सक्ती थांबवणे अशा विविध मागण्यांवर या मेळाव्यात चर्चा झाली. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी सुरू ठेवून कोरोना काळातील थकित प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्याची मागणीही करण्यात आली. या मेळाव्याचे औचित्य साधून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांच्या १० वी आणि १२ वीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत मुलांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला दोन्ही जिल्ह्यांतील हजारो महिला कर्मचारी उपस्थित होत्या.



