जावयाचा सासऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला
सरदार पटेल वॉर्ड परिसरातील घटना
आकाश पिट्टलवारविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा
सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
वरोरा : शहरातील सरदार पटेल वार्ड परिसरात किरकोळ वादातून जावयाने सासऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना २२ मे २०२६ ला रात्रौ दरम्यान घडली असून या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपी आकाश पिट्टलवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीला सूचना पत्रावर सोडले आहे.
पोलीस सूत्रांचे माहितीनुसार, दिपाली लक्ष्मण पवार (वय २५, रा. सरदार पटेल वार्ड, वरोरा) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या आपल्या पती लक्ष्मण पवार व सासरे दादू किसन पवार यांच्यासह संयुक्त कुटुंबात राहतात.
दि. २२ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दिपाली पवार या घरी असताना त्यांची मावशीची मुलगी अंबिका शेळके हिने येऊन चौकात दादू पवार व आकाश पिट्टलवार यांच्यात भांडण सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर दिपाली पवार या त्यांच्या चुलत सासू शोभा दशरथ मंजुळकर यांच्यासह घटनास्थळी गेल्या.
तेथे आकाश पिट्टलवार हा दादू पवार यांच्याशी वाद घालत असल्याचे दिसून आले. यावेळी आरोपीने जवळील धारदार शस्त्राने दादू पवार यांच्या डाव्या बाजूच्या पोटाजवळ व बगलेच्या भागात वार करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेमुळे पवार कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून सूचना पत्रावर सोडले आहे.वरोरा पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.



