Home Breaking News ट्रॅव्हल्सचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चालकावर हल्ला; बसच्या काचा फोडून ४० हजारांचे नुकसान

ट्रॅव्हल्सचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चालकावर हल्ला; बसच्या काचा फोडून ४० हजारांचे नुकसान

6

ट्रॅव्हल्सचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चालकावर हल्ला; बसच्या काचा फोडून ४० हजारांचे नुकसान

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर

वरोरा तालुका, प्रतिनिधी

वरोरा : आनंदवन चौक परिसरात ट्रॅव्हल्सचा हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून चालक व कंडक्टरला मारहाण करून ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्याची घटना शुक्रवार (दि.२२ मे) रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी एकासह दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम निलकंठ गुडदे (वय ५२, रा. शेडेगाव ता. चिमूर) हे प्रविण वरगंठीवार यांच्या साई ट्रॅव्हल्स (क्र. MH-34 BZ-5131) या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. ही ट्रॅव्हल्स दररोज चिमूर ते चंद्रपूर मार्गावर प्रवासी वाहतूक करते.
दि.२२ मे रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान ट्रॅव्हल्स आनंदवन चौक, वरोरा येथे प्रवासी बसविण्यासाठी थांबविण्यात आली होती. ट्रॅव्हल्स चिमूरकडे रवाना होत असताना चालकाने हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून अनुप पाटील रा. वरोरा व त्याच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी चालक पुरुषोत्तम गुडदे व कंडक्टर आशिष दोडके यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
वाद वाढल्यानंतर एका अनोळखी इसमाने लोखंडी रॉडने चालकाच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. तसेच अनुप पाटील व इतर दोघांनी कंडक्टर आशिष दोडके याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर आरोपींनी काठीने ट्रॅव्हल्सच्या समोरील व मागील काचा फोडून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच “तुम्हाला पाहून घेऊ” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी पुरुषोत्तम गुडदे यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी अनुप पाटील व दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 324(4), 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.