Home Breaking News श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या भव्य समर कॅम्पचा उत्साहात समारोप

श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या भव्य समर कॅम्पचा उत्साहात समारोप

6
Oplus_131072

श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या भव्य समर कॅम्पचा उत्साहात समारोप

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर : “जनसेवा हीच ईश्वर सेवा” हा मूलमंत्र जपत बल्लारपूर शहरातील सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य समर कॅम्पचा समारोप सोहळा दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पुरी हॉस्पिटल जवळील महाराणा प्रताप वॉर्ड येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, नागरिक आणि काशी सिंग , बीजभूषण पाझारे, समीर केने, अरुण वाघमारे, नीरज झाडे, मोहित डंगोरे प्रकाश दोतपेली,मुख्याध्यापिका आसमा या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

या समर कॅम्पची सुरुवात १ मे २०२६ रोजी विसापूर येथील क्रीडा संकुलात करण्यात आली होती. तब्बल २२ दिवस चाललेल्या या उपक्रमामध्ये शहरातील तसेच परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये १५ अनुभवी प्रशिक्षकांनी विविध क्रीडा आणि कला प्रकारांचे सखोल प्रशिक्षण दिले.

कॅम्पमध्ये कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो, १०० मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक, बुद्धिबळ, डान्स यांसारख्या विविध स्पर्धात्मक खेळांचा समावेश होता. याशिवाय विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता, शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना आणि सकारात्मक विचार याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

कॅम्पमध्ये सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध खेळांचे प्रशिक्षण घेतले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच काही खेळ प्रत्यक्ष अनुभवत प्रशिक्षण घेतल्याने त्यांच्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रशिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी विशेष मेहनत घेतली.

समारोप कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, समूहगीत, विविध कला सादरीकरण तसेच क्रीडा प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांनी आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा कौशल्याचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना क्रीडा आणि संस्कार यांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही प्रगती केली पाहिजे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात शिस्त निर्माण होते,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच युवकांनी मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळांकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, शशिकांत मुंढे, कमल वर्मा, आकाश चौधरी, सुनील यादव, विनोद कोवे, योगेश मडावी, मिलाप रमेश बानोत,सूरज,मनोज रामनगर,अंकित पोतरलावार, रितेश गुप्ता, आदर्श पोतरलावार व संस्थेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत सकारात्मक दिशा मिळाल्याने पालकांकडून संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.