पेट्रोल-डिझेल दरवाढ व NEET घोटाळ्याच्या निषेधार्थ बल्लारपुरात युवक काँग्रेसचा एल्गार
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
बल्लारपूर, प्रतिनिधी

बल्लारपूर : वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना, NEET परीक्षेतील कथित घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही गंभीर मुद्द्यांच्या निषेधार्थ बल्लारपूर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेश आनंद यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कठोर टीका करत इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर वाढत चाललेल्या आर्थिक भाराचा निषेध व्यक्त केला. “एकीकडे महागाईने जनतेचे जगणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ केला जात आहे,” असे सांगत त्यांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश बावणे, संभाजी ब्रिगेड बल्लारपूरचे प्रवक्ता रोहित चुटे, OBC शहराध्यक्ष गणपत भाऊ इतनकार, ST शहराध्यक्ष नितीन सोयाम, OBC समन्वय समिती बल्लारपूरचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे, माजी अल्पसंख्याक अध्यक्ष ताहीर हुसेन, विनोद आत्राम, नरेश मुंडळा, लकपती घुगलोत, रोहित आमटे, नाना डोंगरे यांच्यासह युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जनतेच्या हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक लढ्यात संभाजी ब्रिगेड सदैव जनतेसोबत खंबीरपणे उभी राहील,” असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता रोहित चुटे यांनी व्यक्त केले.
या आंदोलनामुळे बल्लारपूर शहरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून, विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीही या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.




