Home Breaking News वाघाच्या हल्ल्यात मोटेगाव येथील गुराखी ठार

वाघाच्या हल्ल्यात मोटेगाव येथील गुराखी ठार

205

वाघाच्या हल्ल्यात मोटेगाव येथील गुराखी ठार

प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे वाघाच्या

हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटेगाव येथील दिलीप ननावरे वय 45 अंदाजे हे सकाळच्या सुमारास आपल्या बकऱ्या चराईसाठी पहाडी जंगल परिसरात घेऊन गेले होते. काही वेळाने बकऱ्या घरी परतल्या, मात्र दिलीप ननावरे घरी न आल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान पहाडी जंगल परिसरात दिलीप ननावरे हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शरीरावर वाघाच्या हल्ल्याच्या खुणा आढळून आल्याने वनविभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू आहे.

चिमूर तालुक्यात वाघ-मानव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत असून पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात मानवाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.