Home Breaking News विशेष मतदार.पूनरिक्षण प्रक्रियेदरम्यान सहा.शिक्षकाचा कसूर शिक्षकाचे विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी...

विशेष मतदार.पूनरिक्षण प्रक्रियेदरम्यान सहा.शिक्षकाचा कसूर शिक्षकाचे विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी तहसील प्रशासनाची पोलिसात तक्रार

12

विशेष मतदार.पूनरिक्षण प्रक्रियेदरम्यान सहा.शिक्षकाचा कसूर

शिक्षकाचे विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी तहसील प्रशासनाची पोलिसात तक्रार

सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर

तालुका प्रतिनिधी,चंद्रपूर

वरोरा : 75 वरोरा विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा सहाय्यक शिक्षक संदेश चिकाटे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी तहसील प्रशासनाने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये 2 जून 2026 ला तक्रार दाखल केली आहे.

नायब तहसीलदार (निवडणूक) शरद पुंडलीकराव मसराम यांनी नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा निर्देशानुसार पोलीस निरीक्षक, वरोरा यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संदेश चिकाटे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदवन हे मतदान केंद्र क्रमांक 112 – आनंदवन येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मतदार यादीचे मॅपिंग आणि प्रोजेनी मॅपिंगची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी संबंधित काम विहित मुदतीत पूर्ण केले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
कामातील विलंबाबाबत त्यांना अनेक वेळा सूचना देण्यात आल्या. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, नोटिशीला उत्तर सादर करण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय, दिनांक 1 जून 2026 रोजी SIR कामाचा आढावा घेतला असता अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचे आढळून आले.
तसेच 18 मे 2026 रोजी आयोजित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीलाही संदेश चिकाटे अनुपस्थित राहिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. वारंवार सूचना आणि निर्देश देऊनही त्यांनी निवडणूक संबंधित कामाकडे दुर्लक्ष केल्याने मतदारसंघाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.
याप्रकरणी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 32 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.