• सोन्याचे चेन ला चकाकी देण्याचे नादात चेनच झाली गायब
• दीड लाखांची फसवणूक वरोऱ्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर वरोरा, प्रतिनिधी
वरोरा : शहरातील सरदार पटेल वॉर्ड, महाबँक कॉलनी परिसरात एका निवृत्त नागरिकाची सोन्याची चैन ला चकाकी करून देण्याचे आमिष दाखवत दोन अज्ञात व्यक्तींनी चेनच गायब केली. पीडित व्यक्तीचे सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना 2 जून रोजी घडली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नथ्थु साधोजी दडमल (वय 62) हे आपल्या घरी पत्नीसमवेत असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी चांदी, तांबे व पितळी भांडी स्वच्छ करण्याचे पावडर दाखवून काही वस्तू स्वच्छ करून दाखवल्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसला.
यानंतर तक्रारदारांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (गोप) स्वच्छ करून नवीन करून देण्याचे आश्वासन देत ती चैन त्यांनी घेतली. हळद व पाणी टाकलेल्या एका स्टीलच्या डब्यात चैन ठेवल्याचे दाखवून तो डबा गॅसवर ठेवण्यात आला. त्यानंतर “रजिस्टर घेऊन येतो” असे सांगून दोघेही निघून गेले.
काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर ते परत न आल्याने तक्रारदारांनी डबा उघडून पाहिला असता त्यामधील सोन्याची चैन गायब असल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 318(4) (फसवणूक) व 3(5) अंतर्गत गुन्हा क्रमांक 0721/2026 नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.




