जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आई फाऊंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आई फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था, घुग्घुस यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात नगराध्यक्षा सौ. दिप्तीताई सोनटक्के यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
घुग्घुस परिसरातील विविध उद्योगांमधून होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
आई फाऊंडेशन ही संस्था केवळ पर्यावरण संरक्षणापुरती मर्यादित नसून समाजासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, पर्यावरण, रोजगार, जनजागृती आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर संस्था विविध उपक्रम राबवत असते.
आजच्या स्वार्थी राजकारणाच्या काळात अनेक लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत असताना, निस्वार्थ भावनेने समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांची गरज अधिक अधोरेखित होत आहे. आई फाऊंडेशनचा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.





