• उसेगाव वासीयांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर केला पोलिसांच्या स्वाधीन
• रोज उमा नदि पात्रातील वाळू उपसा सुरू असते ग्रामस्थ संतप्त-वाळू माफियामध्ये खळबळ
सुवर्ण भारत: सुनिल हिंगणकर
प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : – दि. ७ जून २०२६ : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील उसेगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा विरोधात अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत कारवाईचा धडाका लावला आहे. उमा नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. मात्र संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी थेट मैदानात उतरून वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडून चिमूर पोलिसांच्या स्वाधीन केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास काही युवकांनी वाळू तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. यावेळी उमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू भरून येणारा स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली ग्रामस्थांच्या हाती लागला. संबंधित ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू भरलेली होती. ग्रामस्थांनी तात्काळ वाहन अडवून पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर ताब्यात घेतला व पुढील चौकशीसाठी चिमूर पोलीस ठाण्यात जमा केला. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ट्रॅक्टरचे मालक अनिकेत बैस (रा. पिंपळनेरी, ता. चिमूर) असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
*रस्त्यांची दुरवस्था, ग्रामस्थांचे हाल*
उसेगाव ते नेरी मार्गावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे टायर पंचर होणे, अपघाताच्या घटना वाढणे आणि धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होणे यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना कोणाचे तरी संरक्षण असल्यामुळे त्यांचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने आता गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
*उमा नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान*
अवैध वाळू उपसा केल्यामुळे उमा नदीपात्राची नैसर्गिक रचना बदलत असून भूजल पातळीवरही परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. नदीकाठाची धूप वाढणे, शेतीजमिनींना धोका निर्माण होणे आणि जैवविविधतेचे नुकसान होणे अशा अनेक गंभीर समस्या यामुळे उद्भवत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचा आरोप होत आहे.
*प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
चिमूर शहरातून व तालुक्यातील विविध मार्गांवरून वाळूने भरलेली वाहने सर्रास धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-ई वर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही अनेक वाहनांचे चित्रीकरण होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही वाहने तहसील कार्यालय परिसरातूनही जात असल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
*गावकऱ्यांनी दिला इशारा*
उसेगावातील युवक व ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा थांबेपर्यंत आपली मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “गावाच्या विकासाला व पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कामाला आम्ही समर्थन देणार नाही. प्रशासनाने कारवाई केली नाही तर आम्ही अशाच प्रकारे अवैध वाळू वाहतूक पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
*कारवाई करण्याची मागणी*
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे तसेच तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष पथके स्थापन करावीत, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नदीपात्रांचे संरक्षण करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
