Home Breaking News चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मजूर पुरवठा ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन;...

चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मजूर पुरवठा ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन; चौकशीची मागणी

177
Oplus_131072

चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मजूर पुरवठा ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन; चौकशीची मागणी

सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्हा तसेच एमआयडीसी (MIDC) परिसरातील मजूर पुरवठा ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात ‘इंटक’ (INTUC) कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी प्रादेशिक कामगार आयुक्तांकडे तक्रार करत तातडीने चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठेकेदारांच्या या मनमानी कारभारामुळे कामगारांचे आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षिततेचे हक्क धोक्यात आले आहेत.
अनेक ठिकाणी परवान्यापेक्षा जास्त कामगारांकडून काम करून घेणे, कामगारांना वेळेवर व पूर्ण वेतन न देणे, आणि तब्बल १२ तास राबवून घेऊनही केवळ ८ तासांचाच मोबदला देणे अशा गंभीर तक्रारी आहेत. अतिरिक्त कामाचे (ओव्हरटाईम) वेतनही दिले जात नसून ईपीएफ (EPF), ईएसआय (ESI), बोनस यांसारख्या कायदेशीर लाभांपासून कामगारांना वंचित ठेवले जात आहे. अपघात झाल्यास कायदेशीर नुकसानभरपाई न देता अत्यल्प रकमेत तडजोड केली जात असून हजेरी व वेतन नोंदवही देखील व्यवस्थित ठेवली जात नाही.
या सर्व प्रकरणांमुळे कामगारांचे मोठे शोषण होत असून कामगार कायद्याचा मूळ उद्देशच धुळीस मिळत आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांवर व संबंधित उद्योगांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कामगार संघटनेने केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तसेच तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना योग्य कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.