• पाण्याच्या कमतरतेमुळे दुभाजकावरील झाडे गेली वाळून
• नागरिकांच्या मते, पाण्याच्या टँकरचा वापर झाडासाठी कमी, नोंदि भरमसाठ.
वरोरा तालुका प्रतिनिधी
वरोरा नगरपालिकेने २०१९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहीद स्मारक चौकापर्यंतच्या दुभाजकावर झाडे लावून शहराचे सौंदर्य वाढवण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रशासकीय काळात या झाडांना ग्रहण लागले असून, ते ग्रहण आता पर्यंत दूर झालेले नाही. त्यावेळी दुभाजकावर विविधरंगी फुलांची रोपे आणि हिरव्या गवताच्या चटया लावण्यात आल्या होत्या, ज्या आता पाण्याच्या कमतरतेमुळे वाळून गेल्या आहेत. आता तिथे काही मोठी झाडे आणि कचरा वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी, नगरपालिकेने ही वाळलेली झाडे तोडून त्याच ठिकाणी साठवून ठेवली होती. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य वेळ न मिळाल्याने, शहराच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावरील वाळलेली झाडे शहराच्या सुंदरतेत भर घालत आहेत. जवळच्या दुकानदारांच्या मते, उन्हाळ्यात अधूनमधून पाण्याचा टँकर येत असेल, पण झाडांना पाणी घातलेले दिसले नाही, त्यामुळे येथे लावलेली अनेक झाडे आणि हिरवे गवत वाळून गेले आहे. आम्हाला असेही ऐकायला मिळाले की, नगरपालिकेने या झाडांना पाणी न घालता टँकरची बिले काढली आहेत. जर येथील झाडांना नियमित पाणी घातले असते, तर आज दुभाजक हिरवागार दिसला असता, ज्यामुळे शहराचे सौंदर्य वाढले असते. लोकांच्या मते, नगरपालिकेला कोणतेही काम न करता बिले मंजूर करण्याची सवय लागली असावी ज्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, जनता या नगरपालिकेतील पानी पुरवठा विभागासह सर्व विभागांच्या पारदर्शक लेखापरीक्षणाची मागणी करत आहे.







