• विसापुरात १८ महिलांना शिलाई मशीन वितरण
• स्वयंरोजगार देण्यासाठी ग्रामपंचायतीचा उपक्रम : मागासवर्गीय महिलांना मिळाला दिलासा
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम (बल्लारपूर प्रतिनिधी)
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने गावातील १८ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी गटातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विसापूर येथील मागासवर्गीय महिलांनी शिलाई मशीन मिळावी म्हणून २४ महिलांनी ग्रामपंचायत कडे अर्ज सादर केले होते. यातील १८ महिलांची निवड करून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशिनचे वितरण ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले.यावेळी विसापूर ग्रामपंचायत प्रशासक वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य सुरज टोमटे,गजानन पाटणकर यांच्या हस्ते गावातील १८ लाभार्थी महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.
कोट
” गावातील जवळपास १४५ महिलांना ग्रामपंचायत मध्ये शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले.शिलाई मशिनचे वितरण करताना ग्रामपंचायतीने पारदर्शकता पाळली नाही. निवडक लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावर आमचा आक्षेप आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने आम्हाला ठराव द्यावा, असे निवेदन ग्रामपंचायतीला दिले आहे.
-आशा काळे
अध्यक्ष – शेतकरी, शेतमजूर महिला समिती,विसापूर.







