ब्रम्हपुरीतील महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी; भाजप युवा मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन
ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी शहरातील देवळणवाडी वॉर्ड परिसरातील इंदिरा गांधी चौक ते रेल्वे फाटकादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात तहसीलदार मासाळ यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांत या मार्गावर गंभीर अपघात घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी तसेच दुचाकी, चारचाकी आणि जड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. वाढता वेग आणि धोकादायक वळण यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्यामुळे संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावे व भविष्यातील अपघात टाळावेत, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रा. डॉ. सुयोगकुमार बाबुळबुधे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तनयजी देशकर, शहराध्यक्ष अमित रोकडे, माजी नगरसेवक मनोज ठटे, भाजप महामंत्री स्वप्नील अलगटे, उपाध्यक्ष बंटी येरावर, सचिव निखिल प्रधान, केतन परसेने, राहुल शुभेदार, कृष्णा मेहेर, दीपक कावळे, मोहित कावळे, आदित्य लोरेंडे यांच्यासह भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







