#घुग्गुस
• लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन, मार्फत शेतकऱ्यांचे माती परीक्षण व कृषी मार्गदर्शन
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्गुस :लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन, घुग्गुस

अंतर्गत कार्यरत शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे स्थित माती प्रशिक्षण प्रयोगशाळा मार्फत शेतकऱ्यांना मोफत विनामुल्य माती परीक्षण करून देण्यात येते. या उद्देशाने माती परीक्षण प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी घुग्गुस परिसरातील स्थानिक गावातील शेतकरी यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना मातीचे नमुने योग्य पद्धतीने कसे गोळा करायचे कोणती माती परीक्षण करायची या बाबत माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षणासाठी मुरसा येथे स्थित शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे आपल्या मातीचे नमुने प्रयोगशाळा मध्ये तपासणीसाठी जमा केले व त्याची नोंद घेण्यात आली. या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने तपासून त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात आले.
माती परीक्षण अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती, मातीचा सामू (pH), क्षारता तसेच सेंद्रिय कर्ब याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच पिकानुसार संतुलित खत व्यवस्थापन, मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सेंद्रिय शेतीचा अवलंब, तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक पीक निहान कृषी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची अचूक माहिती मिळाल्याने खतांचा योग्य व संतुलित वापर करण्यास मदत होणार असून उत्पादन खर्चात बचत आणि पीक उत्पादकतेत वाढ होण्यास हातभार लागणार आहे.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनच्या शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारचे मोफत माती परीक्षण व कृषी मार्गदर्शन कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.







